इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील संघर्षामुळे जगभरातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. मानवी हानी आणि आर्थिक नुकसानाच्या गंभीर परिणामांमुळे जगाची शांतता ढळून पडली आहे.
राजकारणी हिंसक बनले, मानवता विसरले, अहंकारी बनले. सुरुवात अमेरिका- इस्रायलने केली. इराणने प्रत्युत्तर दिले. तीन देशांच्या संघर्षाने पृथ्वीतळाला घेरले. यात माणसाची निष्ठुरता दिसली. रानटीपणा उजेडात आला. क्रूरतेने कळस गाठला, संस्कृती, दया, करूणा, मैत्री, प्रेमभावाचा विसर पडला. माणूस क्रूरकर्मा बनला. माणसाचे एक स्वरूप असेही आहे. निष्ठूर, निर्घृण, खुनी, अहंकारी. या तीन देशांत घमासान आहे. परस्परांवर हल्ले होत आहेत. त्यांनी जगाला वेठीस धरले.
युद्ध विरोधात सुसंस्कृत अमेरिकन पुढे आले. रस्त्यांवर उतरले, पन्नास राज्यांत नव्वद लाखांवर लोकांनी प्रदर्शन केले. अनेक देशांतून युद्धाला विरोध आहे. युद्ध थांबवा, अशी आर्त हाक आहे. भारत संस्कृतीचे गोडवे गातो. काही स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेतात. उर्वरितांना युद्ध नको आहे. संघटनांची, देशांची व माणसांची मानसिकता ओळखण्याचे क्षण कितीतरी वर्षातून येतात तेव्हा लेखाजोखा होतो. लाखों तरुण नोकर्या सोडून मायदेशी परतले. तिकडे युद्धात हजारो निरअपराधी मारले गेले. त्यात गरोदर माता, निरागस बालके, विद्यार्थी, नागरिक आहेत. युद्धाची झळ जगाला बसली. सामान्य माणसे भरडली गेली. जेवणाचे फाके पडू लागली. कामधंदे सोडून लोक रांगेत लागले. गॅसच्या रांगा, एलपीजीच्या रांगा, पेट्रोलच्या रांगा, असंख्य लोकांचे रोजगार बुडाले. धंदे चौपट झाले. यास दोषी कोण? दोषींना शिक्षा हवी. ती देणार कोण? असे अनेक प्रश्न आहेत. जग बेजार आहे, दु:खी आहे. अखेर तेहतिसाव्या दिवशी जग शांतता शोधात आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी युद्ध सुरू झाले. यात इराण-इस्रायलच्या शहरांतून धुराचे लोट निघत आहेत. अमेरिकन सैनिकांच्या डोळ्यात भीती आहे. या ज्वाला तीन देशांपुरत्या मर्यादित नाहीत. त्या जगभर पसरल्या. प्राणहानी आहे. आर्थिक नुकसान आहे. अप्रत्यक्षरित्या इंधनाच्या किंमती वाढल्या. मानवी कष्ट वाढले. युद्धात कोणी विजेता नसतो. सर्वत्र दु:ख असते. युद्ध सुरू झाल्यापासून एक महिन्याहून अधिक काळ लोटला. अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त कारवाईने इराणच्या क्षेपणास्त्र सुविधा, हवाई तळ आणि औद्योगिक केंद्रांना लक्ष्य केले. इराणने प्रत्युत्तरादाखल इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे सोडली, खाडीतील अमेरिकी तळांवर हल्ले केले आणि हार्मुझ सामुद्रधुनी नियंत्रित केली. या ३३ दिवसांत प्रत्यक्ष प्राणहानी किती? संपत्ती नुकसान किती? खरे आकडे बाहेर येत नाहीत. इंधन अभावाने किती देशांना झळ पोहोचली? कोट्यवधींचे नुकसान कसे झाले? या प्रश्नांची उत्तरे शोधताना हृदय कळवळते, कारण युद्ध केवळ सैनिकांचे नसते. ते मातांचे, मुलांचे, सर्व जीवांचे असते. बौद्ध दृष्टीने हे सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत. एका ठिकाणची वेदना दुसर्या ठिकाणी पोहोचते. प्राणहानी आणि संपत्तीचा विनाश आहे. इराण हा युद्धाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. मानवी हक्क संघटना आदींचे अहवाल आले. टेह्रान, इस्फहान, याझद येथील सुविधा उद्ध्वस्त झाल्या. शाळा, रुग्णालये आणि घरांवरही परिणाम झाला. एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १७० बालके मरण पावली. इराणमध्ये लाखो लोक विस्थापित झाले. औद्योगिक आणि तेल सुविधांचे अब्जावधीचे नुकसान झाले. हे फक्त आकडे नाहीत. या प्रत्येक मृत्यूमागे कुटुंबाची वेदना आहे.
इस्त्रायलमध्येही सैनिक, नागरिक मारले गेले. तेल अवीव आणि जेरुसलेम येथे घरांवर आणि सुविधांवर परिणाम झाला. अमेरिकेचेही काही सैनिक मारले गेले. मध्य पूर्वेतील १७ तळांचे ८०० मिलियन डॉलर्सचे नुकसान आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह-इस्रायल संघर्षातही लोक मारले गेले. खाडीतील देश बहारिन, जॉर्डन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात प्रभावित झाले. जॉर्डन, अझरबैजानसह सुमारे १० देशांमध्ये प्रत्यक्ष प्राणहानी आणि नुकसान आहे. इराण, इस्त्रायल, अमेरिका, लेबनॉन आणि खाडीतील देशांत संपत्तीचे नुकसान अब्जावधी डॉलर्सचे आहे. यामागे प्रत्येक जीवाची कथा आहे. इराणी आईंचा शोक, इस्त्रायली मुलांचे भय, अमेरिकी सैनिकांच्या कुटुंबाची प्रार्थना. बौद्ध करुणेच्या दृष्टीने हे सर्व जीव समान आहेत. त्यांच्या दु:खात भेदभाव नसावा. पेट्रोल, इंधन, गॅसची ९५ देशांना अप्रत्यक्ष झळ बसत आहे. ब्रिटनने युद्धग्रस्त ३५ देशांची बैठक बोलावली. बैठकीत युद्ध, सुरक्षा, भाववाढ, इंधन प्रश्नावर चर्चा होणार.
युद्धाची सर्वात व्यापक बाजू अप्रत्यक्ष आहे. ४ मार्चपासून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी नियंत्रित केली. जगाच्या २० टक्के तेल आणि मोठ्या प्रमाणात एलएनजी यातून वाहतूक होते. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ५५ टक्कांनी वाढली. जगभर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्या. चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपीन्स, सर्वात प्रभावित आहेत. इंधनाच्या रांगा, महागाई आणि रेशनिंग सुरू झाले. युरोप, नायजेरिया, झिम्बाब्वे, व्हिएतनाम सर्वत्र परिणाम आहे. उड्डाण कंपन्या प्रभावित आहेत. शिपिंग खर्च वाढला. खतांच्या किंमती ३० टक्के वाढल्या. जगाच्या अर्थव्यवस्थेवर ०.३ ते १ टक्के जीडीपीचा फटका बसला. ग्लोबल ग्रोथ घटली. भारतासाठी ही झळ तीव्र आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार आहे. दररोज अतिरिक्त खर्च शेकडो कोटीत आहे. शेती, वाहतूक आणि उद्योग प्रभावित झाले. स्टॉक मार्वेâट प्रभावित आहे. मुद्रास्फीती वाढली आहे. होर्मुझ बंदीने केवळ इंधन नाही, तर जगाच्या आर्थिक स्थिरत्ोच्या आशा प्रभावित झाल्या. युद्धाची ज्वाला दूर असली तरी तिची झळ प्रत्येक घरात पोहोचते. मानवी किंमत मोजावी लागते. त्यांची निष्ठूर राजकारण्यांना चिंता नाही. ग्लोबल जीडीपीवर ०.३टक्के फटका म्हणजे लाखो कोटी रुपयांचे नुकसान.
ही संख्या फक्त आकडे नाहीत. ती करोडो लोकांच्या रोजगाराची, भविष्याची आणि स्वप्नांची होरपळ आहे. प्रत्येकजण भीतीत आहे. युद्धास कोणाला दोष देण्यापेक्षा सर्व बाजूंच्या वेदनेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ३३ दिवसांत हजारो जीव गेले. लाखो जखमी झाले. कोट्यवधी विस्थापित झाले. शाळेंवर हल्ला, सैनिकांचे शव, कुटुंबांचे आक्रोश हे चित्र हृदय पिळवटते. युद्ध कधीही विजेता देत नाही. फक्त विध्वंस, बळी, महागाई, भूक आणि बेरोजगारी देते. हिच युद्धाची सावली आहे. या अंधारातही करुणेची किरणे दिसतात. जगभर शांतता आंदोलने, राजनैतिक प्रयत्न होत आहेत. ही संघर्ष थांबवण्याची वेळ आहे. द्वेषाने द्वेष शमत नाही, करुणा आणि संवादाने शांती येते. युद्धाने १० देशांना प्रत्यक्ष वेदनेने पोळले. ९५ देशांना इंधनाच्या प्रभावाने प्रभावित केले. जगाला अब्जावधी कोटींचे नुकसान दिले. यापेक्षा मोठी हानी मानवी आहे. हे युद्ध सर्व बाजूंच्या दृष्टीने पाहणे आणि शांततेचा संदेश देणे आवश्यक आहे. ही ज्वाला विझवण्यासाठी शांतता, संवाद आणि मानवतेची गरज आहे. अन्यथा ही वेदना संपूर्ण जगाला भस्मसात करेल. शांतता हवी, युद्ध नको. या संघर्षात फक्त देश हरलेले नाहीत. मानवता हरलेली आहे.. आता वेळ आहे करुणेची, संवादाची आणि एकतेची. युद्ध थांबविण्याची...!
भूपेंद्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार,नागपूर ९८३४२४५७६८