उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढताच नागरिकांची पावले वॉटरपार्ककडे वळतात.
(Water Park Accident) उन्हाळ्याच्या तीव्र झळा वाढताच नागरिकांची पावले वॉटरपार्ककडे वळतात. मात्र, थोड्याशा निष्काळजीपणामुळे आनंदाचा क्षण कधी दुर्दैवी ठरू शकतो, याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे घडलेल्या घटनेतून आली आहे. येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील वॉटरपार्कमध्ये घडलेल्या अपघातात एका महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते (वय ३७) या आपल्या कुटुंबासह सहलीसाठी मोराची चिंचोली येथे आल्या होत्या. पर्यटनाचा आनंद घेत असताना त्यांनी वॉटर स्लाइडचा वापर केला. मात्र, स्लाइडवरून खाली उतरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या थेट जमिनीवर जोरात आपटल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचाराची गरज असतानाही वॉटरपार्कमध्ये कोणतीही प्राथमिक वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे स्पष्ट झाले असून, कमरेखालचा भाग कायमस्वरूपी निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे संबंधित वॉटरपार्कच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
या प्रकरणी किरण नप्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचे मालक व व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सुट्ट्यांच्या हंगामात वॉटरपार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.