OBC Development Programme: नांदेडमध्ये आयोजित 'कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा'मध्ये ओबीसी आणि बहुजन समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
इतर मागास बहुजन विकास विभागाचे मंत्री अतुल सावे
रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा
नांदेडमध्ये 'कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा' उत्साहात
नांदेड (OBC Development Programme) : इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आणि बहुजन समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. 'ओबीसींचा सर्वसमावेशक विकास करण्यावर शासनाचा विशेष भर' असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन विकास, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे( Minister Atul Save) यांनी केले.
नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्यावतीने आयोजित 'कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्यात' पालकमंत्री सावे अध्यक्षीय पदावरून बोलत होते. या कार्यक्रमास खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार बाबुराव कोहळीकर, महापौर कविता मुळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, (OBC Development Programme) इतर मागास बहूजन कल्याण संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, म.राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसंत माने, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद नारिंगे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे संचालक प्रताप पवार, वनार्टीचे संचालक प्रशांत वावगे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक तेजस माळवदकर, सहाय्यक संचालक सचिन खुने यांच्यासह परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर येथील संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) म्हणाले की, समाजातील तळागाळातील घटकांना आणि विशेषतः ओबीसी प्रवर्गातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. महामंडळांच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या या कर्ज वाटप मेळाव्याचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि राज्याच्या विकासात आपले योगदान द्यावे. रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा, असे आवाहन मंत्री सावे (Minister Atul Save) यांनी केले.
वर्षभरात 75 विद्यार्थ्यांना जवळपास 60 लक्ष रुपयांपर्यत परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात 62 जिल्हानिहाय वसतीगृहे उभारले आहेत. यात केवळ मुंबई-पुणे शहरे अपवाद आहेत. या 62 वसतीगृहामध्ये 31 मुलीसाठी आणि 31 मुलांचे वसतीगृहे आहेत. याशिवाय आधार योजनेच्या माध्यमातूनही ओबीसी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय शासनाकडून करण्यात येत आहेत. स्पर्धात्मक परीक्षेतही विद्यार्थ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले. व्हीजेएनटीच्या 900 आश्रमशाळेतील 100 विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेतून इस्त्रोसारख्या संस्थाना भेट देण्यासाठी शासन पुढाकार घेत असल्याचेही पालकमंत्री सावे म्हणाले.
या ऐतिहासिक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले, वाढत्या स्पर्धेच्या काळात रोजगार आणि व्यावसायिक गुणवत्तेची गरज अधोरेखित झाली असून, 'विकसित भारत २०४७' चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उद्योग उभारणीसाठी गरिबांना येणारी 'मार्जिन मनी'ची अडचण सोडवण्यासाठी सध्या १४ महामंडळे कार्यरत आहेत. आता गावागावांत सुविधा केंद्रे सुरू करून नावीन्यपूर्ण व्यवसायांना चालना दिली जात आहे. ओबीसी आणि इतर मागासवर्गीयांमधील जवळपास ६११ उपजातींना न्याय देण्याच्या उद्देशाने ३१ मार्च २०२६ पर्यंत तब्बल ७० हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील ७० ते ७५ टक्के निधी परतफेड होत असून, हे या योजनेचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
'महाज्योती' व इतर कौशल्य विकास उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजार ३८२ विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड झाली आहे, १८ हजार ७७८ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे आणि २१ हजार ६६० विद्यार्थिनींनी टेलरिंगसारख्या विविध लघु व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा स्वयंरोजगार सुरू केला असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणारा हा अत्यंत यशस्वी आणि दिशादर्शक प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
खासदार डॉ. अजित गोपछडे म्हणाले, या मेळाव्यातून मोठ्याप्रमाणात स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे. शासनाच्या या (OBC Development Programme) योजनांचा प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन इतर पात्र लाभार्थ्यांपर्यत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना आमदार बाबुराव कोहळीकर यांनी बँकांना आवाहन केले की, त्यांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजना तळागाळातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
या (OBC Development Programme) कार्यक्रमात लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज कसे भरावेत याबाबतची माहिती पुस्तिका, वनार्टीच्या माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यासह कार्यक्रमात विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या लाभार्थ्याच्या चित्रफिती दाखविण्यात आल्या. या मेळाव्यात अनेक गरजू आणि होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात आले. तसेच, पालकमंत्री अतुल सावे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या ताबा चावीचे वाटप करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. महापौर कविता मुळे यांनीही विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. प्रास्ताविक इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू दासरी यांनी केले. व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.