Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > महाराष्ट्र

मुंबई मध्ये स्थायी समिती बैठकीदरम्यान चोरीचा प्रकार;पर्समधील पैसे गायब झाल्याने चर्चा

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात कथित चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


मुंबई मध्ये स्थायी समिती बैठकीदरम्यान चोरीचा प्रकारपर्समधील पैसे गायब झाल्याने चर्चा

Mumbai BMC Theft |

मुंबई (Mumbai BMC Theft) : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात कथित चोरीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून सुमारे २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आज स्थायी समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी लक्ष्मी भाटिया उपस्थित होत्या. त्यांनी सभागृहात आपली पर्स ठेवून त्या जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या. मात्र परत आल्यानंतर त्यांनी पर्स पाहिली असता तिची चैन उघडी असल्याचे लक्षात आले. पर्स तपासली असता त्यामधील २० हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी हा प्रकार इतर सहकारी नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या सभागृहात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने नेमके काय घडले याची खात्री करणे कठीण ठरत आहे.

या कथित चोरीबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली असून, एमएस विभाग तसेच सुरक्षा विभागालाही याची कल्पना देण्यात आली आहे. महापौर, विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्यांनाही या घटनेची माहिती कळवण्यात आली आहे.

दरम्यान, पर्समध्ये छेडछाड झाल्याचा संशय आल्याने लक्ष्मी भाटिया यांनी इतर महिला नगरसेविकांनाही हा प्रकार सांगितला. पर्स उघडून त्यातील पैसे काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थायी समितीच्या सभागृहात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस पुढे कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना लक्ष्मी भाटिया म्हणाल्या, “स्थायी समितीला महापालिकेची तिजोरी मानले जाते. अशा ठिकाणीच अशी घटना घडत असेल, तर सुरक्षेबाबत काय बोलायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकरणावरून प्रशासनावर टीका केली. “सभागृहातच सुरक्षा इतकी ढासळलेली असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या घटनेमुळे पालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लक्ष्मी भाटिया नेमकं काय म्हणाल्या?
“आज स्थायी समितीची बैठक होती. बैठक संपल्यानंतर आम्ही सर्वजण जेवणासाठी बाहेर गेलो. त्यावेळी माझी पर्स तिथेच ठेवली होती. आतमध्ये काही कर्मचारी उपस्थित होते. माझ्या पर्समधील २० हजार रुपयांची रोकड कुणीतरी पर्स उघडून काढून घेतली. आम्ही एमएस विभागातील अधिकाऱ्यांना भेटून संपूर्ण माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली, मात्र तिथे कॅमेरेच नसल्याने सत्यता पडताळणे कठीण झाले. पोलिसांना तक्रार दिली असून ते पुढील तपास करत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

“महापौर आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो. कोणावर थेट आरोप नाही, पण जर महापालिकेत नगरसेवकच सुरक्षित नसतील, तर इतरांचे काय? काही मिनिटांसाठी आम्ही जेवायला गेलो असताना पर्स उघडून पैसे काढणे योग्य आहे का? पर्समधील इतर वस्तू तशाच होत्या, मात्र २० हजार रुपयांचे बंडल गायब झाले होते. परत आल्यावर पर्स पूर्णपणे उघडी अवस्थेत होती,” असेही लक्ष्मी भाटिया यांनी सांगितले.