महाराष्ट्रात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.
महापुरुषांशी तुलना; कौतुक करताना सीमारेषा ओलांडली...
(Leader Controversy) महाराष्ट्रात महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच एका जैन मुनीच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद शांत होत असतानाच, आता आणखी एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितेश राणे यांची तुलना केल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे यांचे जोरदार कौतुक केले. मात्र, त्यांच्या गौरवासाठी वापरलेली उपमा वादग्रस्त ठरली. “नितेश राणे यांची उंची ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखी आहे,” असे विधान त्यांनी केले. याचबरोबर राणे यांनी भविष्यात मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यात राणे यांच्या आक्रमक भूमिकेची तुलना बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही करण्यात आली.
मुनींनी पुढे बोलताना विरोधकांनाही सूचक इशारा दिला. “शिवाजी महाराजांचे विचार नितेश राणे यांच्यात दिसतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात ईर्षा बाळगू नका. कायद्याच्या चौकटीत राहिलात तरच फायदा होईल,” असे ते म्हणाले. या वक्तव्यावेळी नितेश राणे स्वतः व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, या विधानानंतर विविध राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुनींवर कठोर शब्दांत टीका केली. “अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांचे शहाणपण सुटले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, देवतांसारख्या पूजनीय व्यक्तींविषयी अशा तुलना केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली. “भगवान महावीरांनी मानवतेचा संदेश दिला होता. मात्र काही जण वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली. शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्त्वाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, याचे भान ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, महापुरुषांबाबत वक्तव्य करताना संयम राखण्याची गरज अधोरेखित होत आहे.
मुधोजी भोसले यांनी ट्विटर (X) वर प्रतिक्रिया दिली.