Bike-car Accident: परभणीतील झरी शिवारात दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील बहिण आणि भाऊचा मृत्यू झाला, तर कारचालक पसार झाला.
झरी शिवारात अपघात; मयत सेनगाव तालुक्यातील
परभणी (Bike-car Accident) : झरी येथे बहिणीला घेऊन गावाकडे परत जाणार्या दुचाकीला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बहिणभावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झरी आणि बोरीच्या शिवारात घडली. मयत हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वटकळी येथील रहिवाशी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी शितल महादेव व्यवहारे, २३ वर्ष रा. वटकळी ही परभणी शहरात बी.टेक शाखेत शिक्षण घेत होती. तिला गावाकडे घेऊन जाण्यासाठी भाऊ राम महादेव व्यवहार, २१ वर्ष, रा. वटकळी हा परभणीला आला होता. सकाळी दोघे बहिणभाऊ एमएच - ३८ टी - २२३१ या क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे परत जात होते. झरीपासून जवळच असलेल्या पेट्रोलपंप परिसरात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला जिंतूरहून परभणीकडे येणार्या एचआर- २० डिएफ - ७८९० या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर या भरधाव कारने धडक दिली. या (Bike-car Accident) अपघातात दुचाकीवरील दोघेही बहिण भाऊ गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पसार झाला.
अपघात एवढा भिषण होता की, दुचाकी हवेत उडून बाजूला जाऊन पडली. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मदत कार्यात सहभाग घेत जखमींना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी दीपक वाघमारे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, अभिजित आडके, आरटीओ अविनाश चोंडे, राष्ट्रीय महामार्ग शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, सानप, असीम खान , बीट जमादार तावरे, सुधीर डोंबे, शंकर जाधव महामार्ग इंजि. अमित गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली.