Gangakhed illegal moneylenders: गंगाखेडमध्ये सहकार विभागाने अवैध सावकाराच्या घरावर काढलेल्या धाडीमुळे धाबे दणाणले गेले. २० मे रोजी सकाळी ८ वाजे नंतर कागदपत्रे जप्त केली गेली
अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे धाबे दणाणले..
परभणी (Gangakhed illegal moneylenders) : गंगाखेड शहरातील भाग्य नगर परिसरात सहकार विभागाच्या पथकाने बुधवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका खाजगी अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकत अवैध सावकारी व्यवसायासंबंधीचे कागदपत्रे जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
तालुक्यातील कासारवाडी येथील अशोक रोहीदास गुट्टे यांनी गंगाखेड शहरातील भाग्य नगर येथील उत्तम बापुराव गुट्टे व पमनबाई उत्तम गुट्टे हे अवैध सावकारीचा व्यवहार करत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिल्याने या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांचे आदेश जा.क्र. जिउनि/सावकारी/कलम १६ अन्वये धाड/ २०२६/८०८ दि. २७ एप्रिल २०२६ अन्वये सहकारी संस्था परभणी कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी एका पथकाची नियुक्ती केली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक श्रीमती ए. जी. निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सदस्य, शासकीय पंचासह पोलीस बंदोबस्तात गैरअर्जदारांच्या भाग्य नगर गंगाखेड येथील उत्तम गुट्टे यांच्या राहते घरी बुधवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धाड टाकून अवैध सावकारी व्यवसायासंबंधी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार घर झडती घेवुन पंचनामा करत अवैध सावकारीशी संबधीत आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले. या पथकात सहकार विभागाचे एस. के. पवार, नु.हा. शेख, एम. के. सय्यद यांच्यासह शासकीय पंच म्हणुन स्थापत्य अभियंता एस.बी. मनके, पोलिस कर्मचारी ओमकार गांजरे व श्रीमती गंगासागर एन. पौळ, व्हिडीओ ग्राफर कृष्णा भोसले आदींचा समावेश होता. सहकार विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
शेतकरी व लहान मोठे उद्योगांना विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडुन कोणाताही सावकारी (Gangakhed illegal moneylenders) व्यवहार करु नये शेतकरी व लहान मोठे उद्योजक तसेच नागरीकांनी गरज भासल्यास नोंदणीकृत परवानाधारक सावकाराकडुन कर्ज स्वरुपात रक्कमा घ्याव्यात असे आवाहन सहकारी संस्था परभणी कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी केले आहे. परवानाधारक सावकाराकडुन शेतकऱ्यांना तारण कर्जावर रु.९ टक्के तर विनातारण कर्जावर रु.१२ टक्के असा व्याजाचा दर असुन शेतकऱ्यांच्या व्यतीरिक्त इतर व्यक्तीसाठी तारण कर्जावर रु.१५ टक्के तर विनातारण कर्जासाठी रु.१८ टक्के असा व्याजाचा दर शासन अधिसुचनेनुसार निश्चित करण्यात आले असल्याचे सांगत अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस दोष सिध्द झाल्यास ५० हजार रुपये दंड व पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायदयानुसार निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.