Interstate Fraud Gang: हिंगोली पोलिसांनी खोटी माहिती देऊन फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीच्या चार सदस्यांना अटक केली. या टोळीने अनेकांना चुना लावला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Interstate Fraud Gang) : कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांना एका मोबाईलवरून कळमनुरीतील एका महिलेच्या खंडवा येथे रेल्वे रूळावर कटून मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह नेण्याकरीता आईस बॉक्सची आवश्यकता आहे. त्यासाठी ५ हजार रुपयाची मदत करा असे सांगुन जीआरपी रेल्वे स्टेशन खंडवा पोलिस निरीक्षक मनोज कुमार बोलतो, असे सांगितल्याने माणुसकीच्या नात्याने वैभव चौधरी यांनी ५ हजार रुपये पाठविले. परंतु हा (Interstate Fraud Gang) प्रकार बनावट व फसवणुकीचा असल्याने त्यात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल १६०० किमी अंतराचा प्रवास करून मध्यप्रदेशातून ४ भामट्यांना जेरबंद केले.
४ एप्रिल रोजी कळमनुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमप्रकाश माकोडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणार्याने स्वतःची ओळख 'खंडवा रेल्वे पोलीस निरीक्षक मनोज कुमार' अशी करून दिली. त्याने सांगितले की, 'हिंगोलीतील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. मृतदेह पाठवण्यासाठी आईस बॉक्सची गरज असून तिच्या नातेवाईकांकडे पैसे नाहीत, तरी तातडीने ५,००० रुपये पाठवा.' माणुसकीच्या नात्याने पोलिसांनी ऑनलाइन पैसे पाठवले. मात्र, काही वेळाने वसमत ग्रामीण पोलिसांनाही असाच फोन आल्याने संशय बळावला.
हिंगोली पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली असता, खुशबू पाटील नावाची कोणतीही मुलगी अपघातात दगावली नसल्याचे स्पष्ट झाले. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले असता, हे फोन मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील 'जुना' गावातून येत असल्याचे निष्पन्न झाले. हिंगोली पोलिसांनी विशेष पथक तयार करून मध्य प्रदेशात धाड टाकली. तेथून पुढील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये अमित कमलेश कुर्मी (३४), विरसींग गोपाल गौंड (४०), भारत दयाराम कुर्मी (५५), सिताराम भारत कुर्मी (१९) यांना ताब्यात घेतले आहे.
हे (Interstate Fraud Gang) आरोपी ऑनलाइन माध्यमातून देशभरातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस स्टेशन प्रभारींचे नंबर मिळवत असत. त्यानंतर रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून संबंधित भागातील व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन पैशांची मागणी करत असत. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी केली आहे.