आजच्या आधुनिक जीवनशैलीत डायबेटिस हा जगभरातील अत्यंत जलद गतीने वाढणारा आजार आहे. भारतात तर प्रत्येक कुटुंबात किमान एकजण या आजारासोबत जगताना दिसतो. चुकीचा आहार, कमी शारीरिक हालचाल, ताणतणाव, अनुवंशिक कारणे आणि स्थुलता ही डायबेटिसची मुख्य कारणे मानली जातात. डायबेटिस हा केवळ रक्तातील साखरेचा विकार नसून संपूर्ण जीवनशैलीला बदल घडवणारा आजार आहे. त्यामुळे डायबेटिस पेशंटचे जीवन समजून घेणे, त्यांचे शारीरिक भावनिक आणि सामाजिक बदल ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डायबेटिस पेशन्टच्या: जीवनातील बदल - डायबेटिस झाल्यानंतर माणसाला सर्वात प्रथम जाणवतो तो जीवनशैलीतील बदलांचा भार. एकेकाळी मनासारखे खाणे नाश्त्याला गोड सणांमध्ये मिठाई अचानक बाहेरचे खाणे-हे सर्व हळूहळू मर्यादित करावे लागते.
डायबेटिस पेशन्टचे दिवस तीन मुख्य गोष्टीभोवती फिरतात- १. आहार नियंत्रण, २. औषधे किंवा इन्सुलीन ३. नियमित व्यायाम. यामध्ये छोटीशी चूक झाल्यास साखरेची पातळी वाढते किंवा अचानक कमी होते. त्यामुळे रुग्णाला दिवसभर सावध राहावे लागते. हे बदल केवळ शरीरापुरते नसून मानसिक पातळीवरही परिणाम करणारे असतात.
'शारीरिक परिणाम'- डायबेटिस हा 'साइलेंट किलर' मानला जातो कारण सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, पण दीर्घकाळात शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.
१. ऊर्जा कमी होणे- रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये न शिरल्यामुळे ऊर्जा निर्मिती कमी होते. त्यामुळे रुग्ण नेहमीच थकलेला, दमलेला जाणवतो.
२. वारंवार लघवी आणि तहान- रक्तातील जास्त साखर शरीरातून बाहेर टाकण्यासाठी किडनी अधिक काम करते. यामुळे वारंवार लघवी व तीव्र तहान अशी लक्षणे दिसतात.
३. दृष्टीवर परिणाम- दीर्घकाळ साखर वाढल्यास डोळ्यांच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. डायबेटिक रेटिनोपथी टाळण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी आवश्यक ठरते.
४. पायांच्या समस्या- पाय सुन्न होणे, जखम लवकर न भरणे, इंफेक्शन यामुळे रुग्णाला सतत काळजी घ्यावी लागते.
५. हृदय व किडनीचे धोके
साखर नियंत्रण नसल्यास हृदयविकार आणि किडनी फेल्युअरचा धोका वाढतो. त्यामुळे डायबेटिस रुग्णासाठी नियमित चाचण्या औषधे आणि आरोग्य तपासणी अत्यावश्यक आहे.
मानसिक आणि भावनिक परिणाम- डायबेटिस हा आजार शरीरात जितका बदल घडवतो तितकाच बदल मनातही घडवतो.
सतत साखरेच्या रिपोर्टची चिंता, औषधांची काळजी, बाहेर खाण्यावर नियंत्रण, भविष्याबद्दलची काळजी यामुळे पेशन्टमध्ये ताण, उदासीनता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. कधी कधी 'आपण इतरांसारखे खाऊ-पीऊ शकत नाही' ही भावना सामाजिक एकाकीपणाही निर्माण करते. अशावेळी कुटुंबाचे सकारात्मक साथ मिळणे, डॉक्टरांचा सल्ला आणि समुपदेशन उपयोगी ठरते.
सामाजिक जीवनातील बदल- डायबेटिसमुळे सामाजिक आयुष्यावर काही मर्यादा येतात. सण-उत्सवांमध्ये मिठाई टाळावी लागते. कॅन्टीन हॉटेल पार्टीमध्ये योग्य पदार्थ निवडावे लागतात. वेळेवर औषध घ्यावे लागते. ऑफिसमध्ये बसून काम करणार्यांना चालणे, हालचाल करणे आवश्यक असते. तरीही योग्य नियोजन केल्यास रुग्ण समाजात पूर्णपणे सक्रिय आणि निरोगीपणे जगू शकतो.
डायबेटिस असूनही निरोगी जगता येते! डायबेटिस हा पूर्ण बरा न होणारा आजार असला तरी तो नियंत्रणात ठेवणे पूर्णपणे शक्य आहे. अनेक लोक २०-३० वर्षे डायबेटिस असूनही उत्साहाने आणि निरोगीपणे जगतात. त्यासाठी काही पायर्यांचे पालन गरजेचे आहे:
१. योग्य आहार, जास्त गोड पदार्थ टाळणे, तुपकट तेलकट कमी करणे, फळे मर्यादित प्रमाणात, पालेभाज्या डाळी ज्वारी-नाचणीसारखे धान्य, साखर नसलेल्या चहा/कॉफी
२. नियमित व्यायाम- दररोज ३०-४५ मिनीट चालणे योगा प्राणायाम सायकलिंग यामुळे साखर नियंत्रणात राहते.
३. ताण टाळणे- मेडिटेशन श्वसन क्रिया छंद यामुळे मन शांत राहते आणि हार्मोन्स संतुलित राहतात.
४. डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित तपासणी - किडनी फंक्शन लिपिड प्रोफाइल डोळे व पाय तपासणे हे वेळोवेळी आवश्यक आहे.
निष्कर्ष- डायबेटिस हा आजार आयुष्यभर चालणारा आहे पण तो 'अडथळा' नाही. योग्य आहार व्यायामऔषधे मानसिक संतुलन आणि कुटुंबाचा आधार असेल तर डायबेटिसमधून मर्यादा नाही तर आरोग्याचे नवे शिस्तबद्ध जीवन घडू शकते.
डायबेटिस पेशन्टचे जीवन म्हणजे संघर्ष नव्हे, तर स्वास्थ्याकडे नेणारी जागरूकता. शिस्त, संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे डायबेटिस असतानाही माणूस तितक्याच उत्साहाने आनंदाने आणि समाधानाने जगू शकतो.
प्रमोद रत्नप्रभा रामकृष्ण निर्मळ
स्वास्थ प्रचारक,
मधुमेह मुक्त भारत अभियान
मु.पो. पथ्रोट, ता.अचलपूर, जि.अमरावती
मो.नं.-९४२०७९८००३