शेलगाव घुगे () : कृषी विज्ञान केंद्र व डॉ. पं.दे.कृ.वि. कृषी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी मौजे शेलगाव घुगे (ता. वाशीम) येथे “भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन” या विषयावर शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाचे (Farmer-Scientist Forum) आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलिस पाटील भगवानराव घुगे, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. गिते तसेच शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख व पशुविज्ञान तज्ञ श्री. एम. एस. देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. एस. के. देशमुख यांनी भूमी सुपोषण अभियानाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट करताना, वाढत्या रासायनिक खतांच्या अवलंबित्वामुळे भविष्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सेंद्रिय खत, कंपोस्ट व जैविक इनपुट्स तयार करून शाश्वत शेतीकडे वळावे, असे त्यांनी आवाहन केले.
डॉ. बी. डी. गिते यांनी मृदा स्वास्थ्यावर अति रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वापराचे दुष्परिणाम स्पष्ट करताना, मातीतील भौतिक संरचना बिघडून कडकपणा वाढत असल्याचे सांगितले. त्यांनी गांडूळखत, कंपोस्ट निर्मिती तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच, मृदाची सुपीकता टिकवण्यासाठी पीक फेरपालट (Crop Rotation) व शेतीपूरक पशुपालनाचा समावेश करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
पशुविज्ञान तज्ञ एम. एस. देशमुख यांनी वैरण विकास, दुग्धव्यवसायातील सुधारित तंत्रज्ञान व एकात्मिक शेती पद्धती यावर मार्गदर्शन करून शेती व पशुपालन यांचे परस्परसंबंध स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. एल. काळे यांनी मृदेचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म यांचे सखोल विश्लेषण करताना, मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे विविध उपाय सांगितले. त्यांनी हिरवळीची खते, उतारावर आडवी पेरणी, पीक फेरपालट व सेंद्रिय पदार्थांचा वापर यांसारख्या मृदा संवर्धन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला.
तांत्रिक सत्रानंतर शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे शास्त्रज्ञांनी समाधानकारक निरसन केले. यानंतर सहभागी शेतकऱ्यांनी विठ्ठल केशव घुगे यांच्या सेंद्रिय खत उत्पादन युनिटला भेट देऊन प्रत्यक्ष तंत्रज्ञानाची माहिती घेतली. (Farmer-Scientist Forum) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. के. देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. एस. पी. गुट्टे यांनी केले.
शेतकरी–शास्त्रज्ञ मंच
‘भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन’ विषयावर शेतकरी–शास्त्रज्ञ मंच यशस्वी
Farmer-Scientist Forum: भूमी सुपोषण व मृदा आरोग्य व्यवस्थापन या विषयावर शेलगाव घुगे येथे शेतकरी–शास्त्रज्ञ मंचाचे यशस्वी आयोजन केले गेले. यामध्ये विविध तज्ञ उपस्थित होते.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Farmer-Scientist Forum
संबंधित सामग्री
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा उत्साहात
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३९ वी सभा प्रशिक्षण सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
Apr 30, 2026