Unseasonal Rain Damage: सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांच्या चिकू व आंब्याच्या बागेतील नुकसान झाले, कडोळीत कांद्याचीही हानी.
शेतकरी संघटनेचा प्रशासनाला थेट इशारा!
सेनगाव (Unseasonal Rain Damage) : निसर्ग कधी राजा करतो तर कधी रंक, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आला आहे. ज्यावेळी हातात पीक येण्याची वेळ होती, ज्यावेळी वर्षभराच्या घामाचे दाम मिळण्याची आशा होती, नेमक्या त्याच वेळी 'अवकाळी'ने घाला घातला. आभाळ फाटलं आणि त्यासोबतच सामान्यांचे स्वप्नही वाहून गेलं.
सेनगाव तालुक्यात शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सातत्याने सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत काही शेतकरी पारंपारिक शेती पिकाला फाटा देऊन फळबागा व नगदी पीक उत्पादनासाठी धाडस करतात परंतु पिक काढणीच्या वेळी अस्मानी संकटाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. तालुक्यातील पळशी येथील प्रगत शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांची व्यथा काळजाला घर पाडणारी आहे. (Unseasonal Rain Damage) वर्षभर पोटच्या पोरासारख्या जपलेल्या एक एकर चिकू आणि एक एकर केशर आंब्याच्या बागा आता उद्ध्वस्त झाल्या आहेत. तोडणीला आलेला चिकू जमिनीवर पडला आहे, तर केशर आंब्याचा सुगंध पावसाच्या मातीत मिसळला आहे.
दुसरीकडे, कडोळीचे दिनेश माहोरकर यांच्या कांदा बीजउत्पादनाचे (कांदा बी) नुकसान झाले आहे. कांदा बीजउत्पादन म्हणजे अत्यंत मेहनतीचे आणि खर्चाचे काम, पण या एका पावसाने माहोरकरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून टाकले आहे. पळशीचे चीकु, आंबे असोत की कडोळीचा कांदा, आज इथला शेतकरी आभाळाकडे बघून विचारतोय, "माझा गुन्हा काय?" हिंगोली जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र या (Unseasonal Rain Damage) अवकाळीने केवळ फळबागाच नाही तर हळद आणि केळीच्या पिकांचेही नुकसान केले आहे. पाणी आणि सोसाट्याचा वारा यामुळे उभ्या पिकांची दाणादाण उडाली आहे.
शेतकऱ्यांच्या या बांधावरच्या अश्रूंची दखल घेण्याऐवजी प्रशासन सुस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांतुन करण्यात येत आहे. याच संताप्यातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, "जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी शेती पिकाचे तातडीने पंचनामे करून नुकसान देण्यात यावी. जर बळीराजाला मदत मिळाली नाही, तर ही शांतता लवकरच विद्रोहात बदलेल. आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि प्रशासनाला जाब विचारू!"
दरवर्षी अवकाळी येते, नुकसान (Unseasonal Rain Damage) होते आणि पंचनाम्यांचे 'कागदी घोडे' नाचवले जातात. परंतु, यंदा परिस्थिती गंभीर आहे. पळशीच्या देशमुख यांच्या बागेतील शेवटचा आंबा आणि कडोळीच्या माहोरकरांच्या शेतातील कांदा आज न्यायाची वाट पाहत आहे. जर वेळेत मदत मिळाली नाही, तर हा अन्नदाता पुन्हा उभा कसा राहणार?
प्रतिक्रिया
थेंब थेंब पाणी देऊन तळ जिवाच राण करुन चिकु आणि केशर आंब्याची दोन एकर फळबाग जोपासली पिक तोडणीसाठी आलेल्या आसमानी संकटामुळे अतोनात नुकसान झाले. शेतकरी अहोरात्र मेहनत करून ही निसर्गाच्या अवकृपेमुळे लागवड खर्च हाती पडत नाही ही बाब चिंताजनक आहे.
-प्रगत शेतकरी , विठ्ठलराव देशमुख