IIT खरगपूर येथील चौथ्या वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने कुटुंबाला पाठवलेल्या धक्कादायक आणि पूर्वनियोजित मेसेजनंतर त्याचा हॉस्टेल रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
कोलकाता (IIT Kharagpur Case) : IIT खरगपूर येथील चौथ्या वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने कुटुंबाला पाठवलेल्या धक्कादायक आणि पूर्वनियोजित मेसेजनंतर त्याचा हॉस्टेल रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक मेसेजनंतर घटनेचा उलगडा
सोहम हलदर (२२) या विद्यार्थ्याने मृत्यूपूर्वी कुटुंबीयांना एक संदेश शेड्यूल करून ठेवला होता. हा मेसेज मंगळवारी सकाळी १०.४५ वाजता बारासत येथील त्याच्या कुटुंबीयांना प्राप्त झाला. मेसेजमधील आशय अत्यंत धक्कादायक होता. मेसेज मिळताच त्याच्या बहिणीने तात्काळ आयआयटीच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
बंद दरवाजा तोडून पोलिसांचा प्रवेश
सुरक्षा अधिकारी तातडीने मदन मोहन मालवीय हॉलमधील सोहमच्या खोलीकडे गेले. मात्र, खोली आतून बंद असल्याचे आढळले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हिजली पोलीस चौकीला माहिती देण्यात आली. पोलिस आणि संस्थेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडून आत प्रवेश करण्यात आला असता सोहम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओग्राफीही करण्यात आले.
रुग्णालयात मृत घोषित
सोहमला तातडीने बी.सी. रॉय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरीही, शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत निष्कर्ष जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी आणि हॉस्टेल माहिती
माहितीनुसार, सोहम हा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या पाच वर्षांच्या (बीटेक + एमटेक) दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी होता. तो मदन मोहन मालवीय हॉल ऑफ रेसिडेन्समध्ये राहत होता.
सलग मृत्यूंमुळे वाढली चिंता
या घटनेमुळे आयआयटी खरगपूर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या १५ महिन्यांत कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही नववी घटना असून, अवघ्या १० दिवसांत ही दुसरी घटना ठरली आहे. यापूर्वी १८ एप्रिल रोजी जयवीरसिंह डोडिया या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा अटल बिहारी वाजपेयी हॉल ऑफ रेसिडेन्सच्या टेरेसवरून पडून मृत्यू झाला होता.
शैक्षणिक अडचणींची शक्यता
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि विद्यार्थ्यांच्या देखरेखीच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमकडे काही विषयांचे बॅकलॉग होते आणि गेल्या दोन सत्रांमध्ये त्याने कोणत्याही कोर्ससाठी नोंदणी केली नव्हती. ही बाब विभागाकडून वेळीच लक्षात घेऊन वरिष्ठांकडे पोहोचवली जाणे अपेक्षित होते, असेही बोलले जात आहे.
संचालकांची प्रतिक्रिया
आयआयटी खरगपूरचे संचालक सुमन चक्रवर्ती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “विद्यार्थी मानसिक तणावात होता आणि त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, विभाग, विद्यार्थी समुदाय किंवा पालकांकडून कोणतेही ठोस संकेत मिळाले नव्हते. त्याचा रूममेटदेखील त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाल्याचे सांगत नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून संबंधित विभागाकडून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जाईल.
विद्यार्थ्यांशी शेवटचा संवाद
विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन अरुण चक्रवर्ती यांनी सांगितले की, “सोहमने सोमवारी परीक्षा दिली होती आणि त्यानंतर कुटुंबीयांशीही संवाद साधला होता.”
कॅम्पसमध्ये शोककळा
दरम्यान, सोहमचे पालक मंगळवारी दुपारी उशिरा कॅम्पसमध्ये पोहोचले. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये शोककळा पसरली असून विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशासनाचे सहकार्य आणि पुढील पावले
आयआयटी खरगपूर प्रशासनाने या प्रकरणात पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व समुपदेशन व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.