दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी उशिरा रात्री भीषण अपघात झाला असून, चालत्या कारला अचानक आग लागल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला.
अलवर (Car Fire Tragedy) : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर बुधवारी उशिरा रात्री भीषण अपघात झाला असून, चालत्या कारला अचानक आग लागल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. मृत सर्वजण मध्य प्रदेशातील श्योपुर जिल्ह्यातील रहिवासी असून, वैष्णो देवीच्या दर्शनावरून परतत होते.
ही दुर्घटना रात्री सुमारे ११ वाजता लक्ष्मणगढ पोलीस ठाणे हद्दीत मौजपूर परिसरात, एक्सप्रेसवेच्या चॅनल क्रमांक 115/300 जवळ घडली. प्राथमिक तपासात कार ही CNG आणि पेट्रोलवर चालणारी असल्याचे समोर आले असून, गॅस गळतीमुळे अचानक आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्योपुर जिल्ह्यातील चैनपुरा गावातील हे कुटुंब भाड्याच्या टॅक्सीने प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी बहुतेक प्रवासी झोपेत होते. आग इतकी वेगाने पसरली की, कोणालाही कारमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, चालक विनोद कुमार हा चालत्या कारमधून उडी मारून बाहेर पडला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र तो सुमारे ८० टक्के भाजला असून, त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर गंभीर अवस्थेमुळे जयपूरच्या सवाई मानसिंह (SMS) रुग्णालयात हलवण्यात आले.
या भीषण आगीत मृतदेह पूर्णतः जळून खाक झाले असून, ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख निश्चित केली जाणार आहे. घटनास्थळी वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) टीमला पाचारण करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच लक्ष्मणगढ पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र आग इतकी भीषण होती की कोणालाही वाचवता आले नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, CNG गॅसमुळे निर्माण होणारी तीव्र उष्णता इतकी प्रखर असते की हाडेदेखील वितळण्याची शक्यता असते. त्यामुळे मृतांचे अवशेष अत्यंत कमी प्रमाणात आढळले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.