6 जुगारी ताब्यात, 54 हजारांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (Hingoli Gambling Operation) : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका सुरूच आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सेनगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत हत्ता पाटी येथील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी 1 जून 2026 रोजी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगार साहित्यासह एकूण 54,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते. हत्ता पाटीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर शेतशिवारात हा जुगार अड्डा सुरू होता. पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याचा वेश परिधान करून शेतात प्रवेश केला आणि अचानक छापा टाकला.
या (Hingoli Gambling Operation) धडक कारवाईत पुंजाजी लोभाजी गडदे, ज्ञानबा कोंडूजी पादरे दोघेही रा. हत्ता पाटी, अनिल कचरू साळवे रा. साखरा, रवी गुलाब चव्हाण रा. पाटोंदा, भाऊराव रामराव पवार रा. भानखेडा, सर्व तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली, या पाच जणांसह एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 52 पत्ते, 4 मोबाईल, जुगाराचे साहित्य व रोख 14,610 रुपये असा एकूण 54,610 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या (Hingoli Gambling Operation) प्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशन येथे मटका व तिरट नावाचा जुगार खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, संदीप जाधव, किशोर सावंत, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने यशस्वी केली. अवैध धंदे चालकांना सळो की पळो करून सोडण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच दिला असून या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
बकऱ्या खरेदीचा केला बहाना
सेनगाव तालुक्यातील हत्ता शेतशिवारात जुगार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी मोटरसायकलवर जाऊन बकऱ्या खरेदी करावयाच्या आहे असे भासवून जुगारावर छापा मारला अचानक आलेल्या पोलिसांमुळे जुगारी देखील भांबावून गेले प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे शेतकरी आणि बकरा व्यवसायिकाच्या वेशभूषेत आलेले पाहून अनेक जण भांबावून गेले होते.