गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताची रात्रभर जबाबदारी पार पाडल्यानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील एएसआयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र महादेवराव कोकांडे (वय ५६) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी (२७ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास कोकांडे यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी त्यांची पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नियुक्ती करण्यात आली होती. बंदोबस्ताची ड्युटी पूर्ण करून घरी परतल्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवला.
परिस्थिती लक्षात येताच त्यांचा मुलगा ऋषभ याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. धंतोली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मेडिकल हॉस्पिटलकडे हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रवींद्र कोकांडे हे मनमिळाऊ आणि सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने नागपूर पोलिस दलातील सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शीला आणि दोन मुले ऋषभ (२७) व रोहित (२५) असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली आहे. कपिलनगर घाट येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून शोकसलामी देत एएसआय रवींद्र कोकांडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला.