सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; ८ जणांवर गुन्हा दाखल, ४ जण पसार
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दांडेगाव शेत शिवारात पोलिस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जवळपास सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना पाहून ४ जण शेतातून पसार झाले. रविवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक श्रेनिक लोढा, आखाडा बाळापूर पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी सुनील रिठे, प्रशांत शिंदे, राजेश घोंगडे, पिराजी बेले, गणपत काळे, राहुल राठोड, पंडित आदी पोलिस पथकाने दांडेगाव तलावाजवळील शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत ३ दुचाकी, रोख रक्कम, जुगार साहित्य असा एकूण २ लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस कर्मचारी सुनील रिठे यांच्या फिर्यादीवरून शंकर रतन बळवंते, मनोज बळीराम बळवंते, सुधाकर तातेराव बळवंते, अशोक पुंजाराव बळवंते, संदीप बाजीराव मारकड, विठ्ठल पांडुरंग बळवंते, आदित्य सुभाष बळवंते आणि अतुल मोहन बळवंते या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक शरद मरे यांनी सांगितले.
पुढील तपास बिट प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.