स्थानिक गुन्हे शाखेची चुडावा पोलिस ठाणे हद्दीत कारवाई
पूर्णा (Parbhani Gambling Raid) : परभणी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असताना, स्थानिक गुन्हे शाखा व चुडावा पोलिसांच्या संयुक्त पथकाने सातेगाव-मीठापूर शिवारातील शिवरस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह ११ मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दोघांना जागेवर पकडले असून अंधाराचा फायदा घेत अन्य जुगारी पसार झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.गजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्तीवर होते. दरम्यान, सातेगाव-मीठापूर शिवारातील शिवरस्त्यावर काही इसम ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. २७ सप्टेंबर रोजी रात्री संयुक्त पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी दोघांना जागेवरच पकडले, तर इतरांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घटनास्थळावरून ९ हजार ७०० रुपये रोख, सुमारे ६ लाख ७० हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ७९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या (Parbhani Gambling Raid) प्रकरणी पोहेकॉ.रंगनाथ दुधाटे यांच्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस ठाण्यात कंठीराम मस्के, धोंडीबा सोनटक्के, मोतीराम लांडे, शाहरुख, तुकाराम साळवे, सोमनाथ भोभळे, पिंटू कोमटवार, भागवत वैद्य, बाबू अंभोरे यांच्यासह अन्य पाच अनोळखी इसम अशा १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चुडावा पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई फौजदार चंदनसिंह परिहार, फौजदार चव्हाण, पोहेकॉ. रंगनाथ दुधाटे, हनुमान ढगे, जमादार चंद्रमुनी हानवते, अनिल मुंढे, बंडू राठोड, पो.कॉ. बायनेवाड यांच्या पथकाने केली.