मटका व जुगारांवर धाडी; 22 जणांविरुद्ध कारवाई, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर (Latur Matka-Gambling Raid) : लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाडी टाकून 22 जणांविरुद्ध कारवाई करीत लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. या कारवाईतून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पथकाने, दि. 30.09.2026 रोजी गांधी मार्केट परिसरातील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत, त्या ठिकाणाहून 15,610/-रुपयांची रोकड व 58,000/- रुपयांचे 7 मोबाईल जप्त केले. या प्रकरणात एकूण 7 इसमांविरुध्द कारवाई करुन, त्यांचेविरुध्द गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 671/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंदविला आहे.
गुळ मार्केट ते सम्राट चौकाकडे जाणाऱ्या रोड लगत आर. के. बारचे शेजारील शटरमध्ये सुरू असलेल्या (Latur Matka-Gambling Raid) मटका बुकीवर कारवाई करत, 39,430/-रुपयांची रोकड व 27,000/-रुपयांचे (3) मोबाईल जप्त केले. या प्रकरणात एकूण (5) इसमांविरुद्ध कारवाई करुन, त्यांचेविरुध्द गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 672/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंदविला आहे.
लातूर शहरातील उपरोक्त कारवायांसोबतच, पथकाने लातूर जिल्ह्यातील कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, बसवेश्वर चौकाजवळ लाला मजकूरी याचे पत्र्याचे शेडसमोर तिर्रट नावाचा (Latur Matka-Gambling Raid) जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. 20,100/-रुपयांची रोकड, 7 मोबाईल व 2 मोटार सायकली असा एकूण 1,57,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण 10 इसमांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याविरुध्द कासारशिरसी पोलीस ठाणे येथे गुरनं 244/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
लातूर जिल्ह्यातील 3 कारवायांत, पथकाने एकूण 22 इसमांकडून 75,140/-रुपयांची रोकड, 17 मोबाईल व 2 मोटार सायकली असा एकूण 2,97,140/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध धंद्यांची माहिती कळवा...
सदर कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ. प्रदिप खानसोळे, पोहेका / गणेश राठोड, पोहेकॉ / संदिप वाघाडे व पोहेकॉ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 'खबर' हेल्पलाइन वरुन माहिती द्या अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.