उदगीर तालुक्यातील थकबाकीदार ६ हजार ६८६ तर नियमित कर्ज परतफेड करणारे २१ हजार १६९ शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले असून, हे सर्व शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.
६,६८६ थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमाफीची , २१,१६९ नियमित कर्जदार शेतकर्यांना प्रोत्सहान अनुदानाची प्रतीक्षा
उदगीर (Udgir Farmers Issue) : उदगीर तालुक्यातील थकबाकीदार ६ हजार ६८६ तर नियमित कर्ज परतफेड करणारे २१ हजार १६९ शेतकरी शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले असून, हे सर्व शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.
उदगीर तालुक्यात “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत ६ हजार ६८६ थकबाकीदार कर्जदार शेतकरी पात्र असून, या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर नियमित कर्जपरतफेड करणारे २१ हजार १६९ शेतकरी प्रोत्साहनपर योजनेसाठी पात्र असून, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
हे सर्व शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत असून, पेरणीपूर्व अंमलबजावणी होऊन कर्जाचे पुनर्गठन झाल्यास खत, बी-बियाणे खरेदीसाठी मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.महाराष्ट्र सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करत राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर प्रति शेतकरी कमाल २ लाख रुपये कर्जमाफी देण्यात येणार आहे.
यामुळे उदगीर तालुक्यातील ६ हजार ६८६ थकबाकीदार आणि २१ हजार १६९ नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत. विशेष बाब म्हणजे, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप ना लाभ मिळाला, ना अंतिम याद्या जाहीर झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या कर्जमाफी योजनेसाठी अल्पकालीन पीक कर्ज घेणारे, राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा सहकारी बँका व इतर मान्यताप्राप्त बँकांचे कर्जदार शेतकरी पात्र आहेत.
उदगीर तालुक्यात ६ हजार ६८६ थकबाकीदार सभासद शेतकरी असून त्यांची एकूण थकबाकी ४३ कोटी ४६ लाख ६ हजार ८०० रुपये आहे. या शेतकऱ्यांची शासनाच्या नियमानुसार २ लाखापर्यत कर्जमाफी होणार आहे.
तर तालुक्यातील २१ हजार १६९ नियमित सभासद शेतकरी असून, त्यापैकी २० हजार ४८९ शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. उर्वरित शेतकरी बँक ई-केवायसी, आधार अपडेट, बचत खाते नसणे आदी कारणांमुळे प्रलंबित असून, त्यांची माहितीही शासनाकडे पाठविली जाणार आहे.,त्यामुळे तालुक्यातील सर्व २१ हजार १६९ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.एकंदरीत, योजना जाहीर होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि यादी जाहीर न झाल्याने उदगीर तालुक्यातील हजारो शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतिक्षेतच आहेत.
पेरणी तोंडावर; शेतकऱ्यांची वाढती चिंता
पेरणीचा हंगाम जवळ येत असताना कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांसमोर खत, बियाणे व शेती खर्चाचे मोठे संकट उभे टाकले आहे. कर्जमाफी वेळेत झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने त्वरित अंमलबजावणीची मागणी जोर धरत आहे.
पाञ शेतकर्यांची माहिती शासनाकडे पाठविली,अमलबजावणी होताच शेतकर्यांना लाभ मिळेल
“शासनाने घोषित केल्याप्रमाणे तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठविली आहे.शासानाने या योजनेची अमलबजावणी करताच थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, तसेच नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळेल. प्रक्रिया सुरू असून लवकरच लाभ दिला जाईल - ”बी. एस. नांदापूरकर, सहाय्यक निबंधक, उदगीर
घोषणा झाली… अंमलबजावणी कधी?
सरकारने मोठ्या अपेक्षांनी योजना जाहीर केली असली तरी अद्याप ना लाभ, ना अंतिम याद्या जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी पसरली आहे. “योजना प्रत्यक्षात उतरणार की कागदावरच राहणार?” असा सवाल आता सर्रास विचारला जात आहे.
उदगीर तालुक्यातील कर्जमाफी शेतकर्यांची संख्या
६,हजार ६८६ थकबाकीदार शेतकरी
एकूण थकबाकी ४३कोटी.४६ लाख ६ हजार ८००
२१ हजार १६९ नियमित कर्जपरतफेड करणारे शेतकरी सभासद संख्या यापैकी २० हजार,४८९ शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठविली.उर्वरीत शेतकर्यांची तांञीक अडचणी दूर करुन त्याही शेतकर्यांची यादी पाठविली जाणार आहे.
शासनाने पेरणीच्या आगोदर या योजनेचा लाभ दया
शासनाने कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यासाठी५० हजार रुपये प्रोत्सहानपर अनुदान शेतकर्यांना पेरणीच्या आगोदर दयावे त्यामूळे शेतकर्यांना पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदी करताा येतील अन्यथा यासाठी शेतकर्यांना सावकाराचे दारे ठोठावे लागेल.त्यामूळे लवकरात लवकर या योजनेची अमलबजावणी करावी - संतोष वळसने शेतकरी नळगीर