Taj Plastic Company Fire: तिवसाघाट नजिकच्या ताज प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागून १० कोटी रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी दोन तास आग विझविण्याचा प्रयत्न
वरूड़ (Taj Plastic Company Fire) : वरूड–मुलताई महामार्गावरील तिवसाघाट परिसरातील ताज प्लास्टिक कंपनीला शनिवार, २५ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला. घटनेची माहिती मिळताच काटोल, मोवाड, नरखेड, वरूड, शे.घाट, मोर्शी तसेच मुलताई नगरपरिषद अग्निशमन विभागाच्या गाड्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही (Taj Plastic Company Fire) आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. प्लास्टिक साहित्यामुळे आग अधिक वेगाने पसरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान, शे.घाटचे ठाणेदार दिपक महाडिक आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमलेल्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम हाती घेतले. तरीही आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे दिसून आले. या (Taj Plastic Company Fire) भीषण आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती.