लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे 19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
बुलढाण्यात तरुणीचा हृदयद्रावक मृत्यू
बुलढाणा (Snake Bite) : सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. कधी ऊन, कधी दमट हवा, तर सकाळी गार वारे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे तर प्राणी आणि सरीसृपांवरही होत आहे. विशेषतः सापांसाठी हे वातावरण अस्वस्थ करणारे ठरत असून, त्यामुळे ते बिळाबाहेर येऊन सुरक्षित ठिकाण शोधू लागतात. परिणामी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशाच एका हृदयद्रावक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे 19 वर्षीय तरुणीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रवींद्र शेषराव सानप यांची मुलगी साक्षी ही शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आई-वडिलांसोबत झोपली होती. मात्र रात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच तिला सापाने चावा घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सकाळी उठल्यानंतर साक्षीला घशात वेदना जाणवत होत्या, तसेच तिला ॲसिडिटीसारखा त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी सुरुवातीला त्याकडे सामान्य आजार म्हणून पाहिले. तरीही तिची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच तिला तातडीने लोणार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाही तिच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. सर्पदंशाची लक्षणे स्पष्ट होत गेल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मेहकर येथे हलवण्याचा सल्ला दिला.
मात्र, मेहकरकडे नेत असताना वाटेतच साक्षीची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नंतर परिसरात शोध घेतल्यावर संबंधित साप शेजारील अंगणात आढळून आला, त्यामुळे सर्पदंशामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
साक्षी ही सुलतानपूर येथील बी. फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्या अकाली निधनाने गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय तपासणीनंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा तसेच नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागात सर्पदंशाविषयी जागरूकता वाढवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बदलत्या हवामानात विशेष खबरदारी घेणे, घराभोवती स्वच्छता राखणे आणि अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.