भाजप सरकार हे भांडवलशाही धोरण राबवून महावितरणमध्ये गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने व्यूहनिती आखत असल्याचा आरोप माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला आहे.
चिखली (Smart Meter Controversy) : भाजप सरकार हे भांडवलशाही धोरण राबवून महावितरणमध्ये गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीने व्यूहनिती आखत असल्याचा आरोप माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केला आहे. महावितरणचा कारभार अत्यंत भ्रष्ट झाला असून आधीच विजेचे दर सातत्याने वाढत आहेत. ग्राहकांना बिल का वाढत आहे, हेच समजत नाही. त्यात आता स्मार्ट मीटर लावून लोकांच्या बिलात दुप्पट-तिप्पट वाढ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनेक ठिकाणी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचे सांगत, त्यानंतर ग्राहकांना भरमसाठ वीजबिले येत असल्याचे त्यांनी नमूद केले. सरळसरळ सोलार कंपन्यांच्या फायद्यासाठी हे धोरण राबवले जात असल्याचा आरोप करत, लोकांनी महावितरणचे मीटर काढून टाकून घरावर सोलार बसवावे, यासाठीच हा सगळा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र पुढे सोलारधारकांनाही फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे धोरण हे केवळ भांडवलदारांना पोसणारे असल्याचा घणाघातही त्यांनी केला. एकंदरीत महावितरण हे सोलार उद्योगपतींच्या दावणीला बांधले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
सोमवार २५ मे रोजी शहर काँग्रेसने स्मार्ट मीटर सक्तीविरोधात चिखलीत जोरदार आंदोलन छेडले. महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी भाजप सरकारवर आणि महावितरणच्या कारभारावर जोरदार टीका केली. स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादला जात असल्याचा, तसेच वाढीव व अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करण्यात आला.
ग्राहकांच्या संमतीशिवाय सुरू असलेल्या या कारभाराविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याचे यावेळी दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला तसेच महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महावितरण प्रशासनाला निवेदन देऊन ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावू नयेत, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनास न.प. विरोधी पक्षनेते डॉ. मोहमद इसरार, गोपाल देव्हडे, उबेद अली खान, गोकुळ शिंगणे, आनंद बोंद्रे, डॉ. अमोल लहाने, संतोष देशमुख, रत्नदीप शिंगरे, प्रशांत भटकर, युवक काँग्रेसचे जकीर शेख, अयान जमादार, भास्कर चांदोरे, व्यंकटेश रिंढे, पवन पाटील, रोहन पाटील, हाजी समद बागबान, कैलास जंगले, समीर खान, अबरार शेख, जमील शेख, मोहम्मद शाहरुख, साजिद हाजीसाहब, जमील ठेकेदार, फाजिल जमादार, शेख अबरार, शेख नासिर, साजिद, हादी भाई, शेख अतीक, गुड्डू भाई, संदीप खरात, महेश मुंडलिक, शेख उमैर, शेख अब्दुल, सय्यद भाई, शेख रौशन, विजय जवंजाळ, सौरभ बनपुरे, राहुल तायडे, अमोल पहारे, अमोल सोनुने, गणराज खुर्द, सोमेश घाडगे, विजय बनपुरे, बजरंग खरात, सुरेश शिंगणे, प्रदीप जवंजाळ, शंभू सोनवणे, कैलास जोहरे आदी उपस्थित होते.
“भारताचा कोणीही बाप होऊ शकत नाही” : राहुलभाऊ बोंद्रे
राज्यात मोठ्या प्रमाणात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याचा आरोप करत, शेतकरी, गरीब आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांनी सांगितले. सरकारचे धोरण हे केवळ भांडवलदारांना पोसणारे असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत असल्याचे त्यांनी म्हटले.
हे सरकार अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप करत, “अमेरिकेला बाप म्हणणारे हे सरकार आहे. भारताचा कोणीही बाप होऊ शकत नाही. इथली सर्वसामान्य जनता हीच आमचा देव आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सर्वसामान्यांप्रती असलेली भावना महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली असून, यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.