राज्यपाल नियुक्त कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई (Political Controversy) : राज्यपाल नियुक्त कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पक्षाकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात असले तरी, नायकवाडी यांनी या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे.
“मला पक्षाकडून किंवा कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडून राजीनाम्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. तरीही उद्या पक्षाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात अशी कोणतीही राजीनाम्याची चर्चा झाली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या निवडीबाबत बोलताना नायकवाडी म्हणाले की, त्यांना आमदारकी देताना “ही संधी एकदाच मिळणार असून भविष्यात विधानसभेची तयारी करा,” असा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे आपण आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षांतर्गत मतभेद आणि दबावाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षात काही व्यक्ती अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक होणार असून, या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहाय्यक आपल्याला भेटल्याच्या चर्चांबाबतही नायकवाडी यांनी खुलासा केला. “माझा हात फ्रॅक्चर झालेला असताना ते कोल्हापूर परिसरात होते. त्या वेळी फक्त भेट झाली होती,” असे त्यांनी सांगितले.
याआधी सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदावर असताना देखील आपल्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. मात्र, त्यावेळी आपण ठामपणे राजीनामा देण्यास नकार दिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इद्रीस नायकवाडी हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अल्पसंख्याक चेहरा म्हणून ओळखले जातात. सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर निवड झाली होती.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना ही संधी देण्यात आली होती. मात्र, पक्षात झालेल्या अंतर्गत बदलांनंतर आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला असून, याबाबत अंतिम निर्णय काय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.