Parbhani Zilla Parishad: परभणी जिल्हा परिषदेतील सभापती पदाची निवड बिनविरोध झाली. भाजपाने दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी एक सभापती पद पटकावले.
भाजपाला चार पैकी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा एक सभापती
परभणी (Parbhani Zilla Parishad) : जिल्हा परिषदेत विषय समिती सभापती निवडणूक आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवार २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पार पडली. नाट्यमय घडामोडी मध्ये भाजपने चार पैकी दोन सभापती तर एक सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला व एक सभापती पद शिवसेनेला बिनविरोध मिळाले. निवडणूक प्रक्रिया पिठासीन अधिकारी उदयसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक अधिकारी संदीप घोन्सीकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
चारही समित्यांच्या सभापतीपदाकरीता पिठासिन अधिकार्यांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत इच्छुक उमेदवाराकडून नामनिर्देशनपत्रे स्विकारली. त्यात एकूण ११ अर्ज दाखल झाले. त्यात दोन दुबार नाव असलेले अर्ज त्यामुळे ९ पात्र उमेदवार कौशल्याबाई शिंदे, सविता मुरकुटे, वैशाली जाधव, दिपाली चौधरी, संग्राम जामकर, पार्वतीबाई मुंढे, सुचिता भरोसे, माणिक हरकळ, सरुबाई जाधव, ऐश्वर्या चव्हाण त्यापैकी समाज कल्याण सभापतीपदी कोद्री (गंगाखेड) गटातील भाजपच्या पार्वतीबाई प्रल्हाद मुंढे , महिला व बालकल्याण सभापतीपदी पोखर्णी गटातील भाजपच्या ऐश्वर्या अजय चव्हाण यांची निवड झाली. उर्वरित दोन विषय सभापती पदाकरीता ७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ४ जणांनी माघार घेतली. त्यानंतर वैशाली जाधव आणि दिपाली चौधरी या दोघांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे अर्ज माघार घेण्यासाठी वेळे वाढवून देण्यात आली.
त्यात दिपाली अजय चौधरी यांनी माघार घेतली. त्यामुळे (Parbhani Zilla Parishad) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताडबोरगाव (मानवत), गटातील वैशाली पंकज जाधव (आंबेगावकर) व केकरजवळा (मानवत) गटातील शिवसेनेच्या कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांची विषय सभापतीपदी निवड झाली. विजयानंतर अध्यक्ष लता वाकळे व उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पीठासिन अधिकारी उदयसिंह भोसले, सहाय्यक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोन्सीकर, जि.प.सिईओ नतीशा माथुर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेत (Parbhani Zilla Parishad) आता महिला राज या निवडीबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हा परिषदेत येवून नवनियुक्त सभापती यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आता जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, चार जि.प.सभापती पदी महिला विराजमान झाल्या असून या निमित्ताने जिल्हा परिषदेत महिला राज आले असून जनतेच्या हिताची कामे करा अशा सुचना दिल्या.