Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पानकनेरगावचा चैतन्य मरडेचा राज्यस्तरीय झेप; महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण यश

पानकनेरगावचा चैतन्य मरडेने महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत नवा विक्रम रचला.


पानकनेरगावचा चैतन्य मरडेचा राज्यस्तरीय झेप महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्ण यश

Pankanergaon Inspiration |

पानकनेरगाव (Pankanergaon Inspiration) : विदर्भ–मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या पानकनेरगाव या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबातून उगवलेला युवक आज आपल्या जिद्दी, मेहनती आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात चमकत आहे. चैतन्य संतोष मरडे या तरुणाने ३६ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई येथे नव्या विक्रमाची नोंद करत सुवर्ण यश संपादन केले असून, त्याच्या या यशाची दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून घेतल्याने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

शेतकरी कुटुंबातील संतोष मरडे व छाया मरडे यांच्या पोटी जन्मलेले चैतन्य आणि त्याची बहीण ऋतुजा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण व क्रीडा क्षेत्रात मेहनत घेत २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवले. ऋतुजा सध्या परभणी पोलीस दलात तर चैतन्य सातारा पोलीस दलात कर्तव्य बजावत आहे. एका सामान्य कुटुंबातील दोन्ही लेकरांनी एकाचवेळी पोलीस दलात प्रवेश मिळवणे हीच गावासाठी अभिमानाची बाब ठरली.

चैतन्यला लहानपणापासूनच खेळाची प्रचंड आवड होती. इयत्ता चौथीत असतानाच कै. गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा प्रबोधिनीत निवड झाली. वयाच्या कोवळ्या टप्प्यातच आई-वडिलांपासून दूर राहून त्याने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण व कठोर सराव प्रबोधिनीत पूर्ण केला. त्यानंतर कोळसा येथे अकरावी-बारावीचे शिक्षण घेत असतानाही त्याने स्पर्धात्मक खेळ सुरूच ठेवला.

२०१९ मध्ये पंजाबमधील लुधियाना येथे गुरु द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक एस. एस. पन्नू यांच्या मार्गदर्शनाखाली १०० मीटर धावणे आणि ट्रिपल जंपचे विशेष प्रशिक्षण घेत असताना कोरोनाचे संकट ओढवले. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना चैतन्यला फेब्रुवारी ते जूनपर्यंत एका खोलीत बंद राहण्याची वेळ आली. मात्र या संकटाने त्याची जिद्द खचवली नाही; उलट याच काळात त्याने स्वतःला अधिक मजबूत केले.

यानंतर महाराष्ट्र पोलीस भरतीची संधी मिळताच त्याने सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘राजमुद्रा करिअर अकॅडमी’मध्ये प्रवेश घेतला. प्रा. सागर खाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कठोर परिश्रम घेतले. खाडे सरांनीही त्याला स्वतःच्या भावाप्रमाणे साथ देत अभ्यास व प्रशिक्षणात विशेष मेहनत घेतली. त्याचे फळ म्हणजे चैतन्य आणि ऋतुजा या दोघांनाही महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वी प्रवेश मिळाला.

पोलीस प्रशिक्षणादरम्यानही चैतन्यची खेळावरील निष्ठा कायम राहिली. कर्तव्य आणि सराव यांचा समतोल साधत त्याने पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतला. अखेर मुंबई येथे पार पडलेल्या ३६ व्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेत त्याने स्वतःचाच जुना विक्रम मोडत नवा इतिहास रचला. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्याला सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात चैतन्यच्या जिद्दीचे व यशाचे कौतुक करत त्याचा विशेष उल्लेख केला. त्यामुळे पानकनेरगावचे नाव राज्यभर झळकले असून गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चैतन्यच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवकांसमोर प्रेरणेचा नवा आदर्श उभा राहिला आहे. खेळाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवत व्यसनमुक्त राहून मोठे यश मिळवता येते, हा संदेश चैतन्यच्या संघर्षमय प्रवासातून तरुणाईला मिळत आहे.