दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत.
नागपूरकरांसमोर उलगडणार आपल्या भूमिकांचे मर्म
नागपूर (Pankaj Kapoor) : रंगभूमी, दूरदर्शन आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाने रंग भरणारे दिग्गज अभिनेते पंकज कपूर शनिवार, ११ एप्रिल रोजी वनामती येथे दुपारी ४ वाजता नागपूरकर रसिकांसमोर आपल्या कारकिर्दीचे मर्म उलगडणार आहेत. अजेय गंपावर त्यांच्याशी संवाद साधतील. नागपूर एडिशन ऑफ पिफ आणि मेराकी थिएटर्सच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एनएसडीयन असणारे पंकज कपूर मकबूल, एक डॉक्टर की मौत, जाने भी दो यारों, एक रूका हुआ फैसला, मटरू कि बिजली का मंडोला, रोजा, जलवा यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी ओळखले जातात. शेक्सपिअरच्या मॅकबेथवर बेतलेली मकबूल चित्रपटातील त्यांची अब्बाजींची भूमिका तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. नुकत्याच आलेल्या जब खुली किताब या नर्म विनोदी चित्रपटातील डिंपल कपाडिया यांच्यासोबतची त्यांची जोडी सर्व स्तरातील रसिकांना आवडलेली आहे. चित्रपटात उत्तम कारकिर्द घडत असतानाही पंकज कपूर यांचे रंगभूमी आणि टेलिव्हीजनवरचे प्रेम कायम राहिले आहे. करमचंद जासूस, ऑफिस ऑफिस, मुंगेरीलाल के हसिन सपने या त्यांच्या सिरीयल्स प्रचंड गाजल्या.
जवळपास ७५ नाटकांमध्ये समृध्द अभिनयाचे प्रदर्शन करणारे पंकज कपूर उत्तम लेखकही आहेत. नॅशनल फिल्म अवॉर्ड, फिल्मफेअर या प्रतिष्ठित पुरस्कारांनी अनेकदा सन्मानित झालेले पंकज कपूर समांतर व लोकप्रिय चित्रपटातील विविध भूमिकांसाठी ओळखले जातात.
अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या
श्याम बेनेगल ते विशाल भारद्वाज या निरनिराळ्या पिढीतील प्रतिभावंत दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी उत्तमोत्तम भूमिका वठवल्या आहेत. रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी चित्रपटात त्याची भूमिका आहेच पण हिंदी आवृत्तीत ते गांधींचा आवाजही होते. अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन यावर हुकूमत असणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर, यांच्याकडून त्या त्या माध्यमातील तंत्राबाबत समजून घेण्याची ही तरुण पिढीसाठी उत्तम संधी आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.