Onion prices fall: रब्बी हंगामात कांदा पिकाच्या काढणीत वाढ असताना बाजारातील दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन खर्च निघेनाशीवाय नफा दूरची गोष्ट बनली आहे.
पातूर (Onion prices fall) : सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकाची काढणी जोरात सुरू असताना बाजारातील घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. मात्र बाजारात कांद्याचे दर घसरून केवळ 600 ते 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे.
कांद्याच्या उत्पादनासाठी (Onion prices fall) साधारणतः 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल इतका खर्च येत असल्याने सध्याच्या दरात शेतकऱ्यांना नफा तर दूरच, खर्चही निघत नसल्याचे वास्तव आहे. साधारणतः हजार ते बाराशे रुपये दर मिळाल्यासच शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होतो. मात्र सध्या बाजारात त्यापेक्षा खूपच कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
दरम्यान, कांदा साठवणूक करणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. योग्य साठवण सुविधा नसल्याने आणि अवकाळी पावसाचा धोका असल्याने कांदा खराब होण्याची भीती कायम आहे. त्यामुळे कमी दरातच कांदा विकण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात जलसिंचन सुविधेमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. बीज निर्मितीपासून काढणीपर्यंत (Onion prices fall) कांदा पीक अत्यंत खर्चिक आणि मेहनतीचे असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हे पीक घेतले होते. मात्र बाजारातील घसरणीमुळे पुन्हा एकदा कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकंदरीतच, रब्बी हंगामातील कांदा पिकाकडून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण पसरले आहे.