Hingoli Water Crisis: हिंगोलीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी तीन किलोमीटर चालावे लागत आहे, प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज.
पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट
हिंगोली (Hingoli Water Crisis) : हिंगोली शहरात भीषण पाणीटंचाईचे सावट गडद होत असून, नगरपालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरात सध्या चार ते पाच दिवसाआड पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना 'वणवण' भटकण्याची वेळ आली आहे.
कुशाल नगरमधील कुटुंबाची पाण्यासाठी धडपड
पाणीटंचाईचे दाहक वास्तव जिल्हा परिषद रोडवर पाहायला मिळाले. शहराच्या कुशाल नगर भागातील एक कुटुंब (Hingoli Water Crisis) पिण्याच्या पाण्यासाठी चक्क तीन किलोमीटर दूरवरून पायपीट करत सार्वजनिक नळावरून पाणी नेताना दिसून आले. उन्हाचा तडाखा वाढत असताना, हंडाभर पाण्यासाठी या कुटुंबाला करावी लागणारी 'मरमर' शहरातील पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
सार्वजनिक नळांवर गर्दी
शहरातील बहुतांश भागात नळाला पाणी (Hingoli Water Crisis) येत नसल्याने नागरिक सायकल, दुचाकी किंवा डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरत आहेत. जिल्हा परिषद रोडवरील सार्वजनिक नळावर सकाळपासूनच पाण्यासाठी रांगा लागत असून, दूर अंतरावरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.