Hingoli DP Burnt: हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानामुळे विद्युत रोहित्र जळून खाक; शेतकरी नवीन रोहित्रांसाठी दीर्घकाळ रांगेत उभे राहत आहेत.
जनित्र दूरूस्तीला दिरंगाईचा बसतोय फटका
हिंगोली (Hingoli DP Burnt) : जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशी पार करत असतानाच ग्रामीण भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र (Dp) जळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून, नवीन रोहित्र मिळवण्यासाठी हिंगोलीतील खटकाळी येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकर्यांच्या पिकअप वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
उन्हाचा फटका रोहित्रांना (Hingoli DP Burnt) बसत आहे. परिणामी ग्रामीण भागात अंधार दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या तापमानामुळे विजेचा वापर वाढला आहे. क्षमतेपेक्षा जास्त भार आणि वाढती उष्णता यामुळे गावागावांतील रोहित्र जळून खाक होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक गावे अंधारात असून, विहिरींना पाणी असूनही केवळ वीज नसल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे.
खटकाळी परिसरात पिकअपचा वेढा सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हिंगोली येथील खटकाळी भागात महावितरणचे मुख्य कार्यालय व भांडार आहे. जळालेले रोहित्र बदलून नवीन मिळवण्यासाठी ग्रामीण भागातून शेतकरी स्वतः खासगी पिकअप वाहने भाड्याने घेऊन येत आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, खटकाळी परिसरात महावितरणच्या गेटपासून रस्त्यापर्यंत पिकअप वाहनांची गर्दी झाली असून, जणू 'पिकअपची जत्रा'च भरली की काय, असा भास होत आहे.
शेतकरी हैराण झाले असुन प्रशासकीय दिरंगाईचा फटका त्यांना बसत आहे. (Hingoli DP Burnt) एकीकडे कडक ऊन आणि दुसरीकडे जळालेली डीपी; अशा दुहेरी संकटात आम्ही सापडलो आहोत. पिकअपचे भाडे भरून दोन-दोन दिवस इथे रांगेत उभे राहावे लागत आहे,' अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. रोहित्र उपलब्ध होण्यास होणारा उशीर आणि वाढती मागणी यामुळे शेतकर्यांचा संयम सुटत चालला आहे. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोहित्रांचा पुरवठा तातडीने वाढवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.