Hingoli Municipality: हिंगोली नगरपालिकेत नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी कर्मचार्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या आहेत, विभागीय कामकाजात पायाभूत सुधारणा आवश्यक.
नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी कामकाजात सुधारणा घडवून आणण्याच्या कर्मचार्यांना दिल्या सुचना
हिंगोली (Hingoli Municipality) : नगरपरिषदेत कार्यालयात १ एप्रिल बुधवार रोजी अधिकारी,कर्मचार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी कर्मचार्यांना कामकाजात सुधारणा घडवून आणण्याच्या सुचना दिल्या आहेत.
येथील नगर परिषदेमध्ये (Hingoli Municipality) अधिकारी व कर्मचार्यांची आढावा बैठक नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला उपनगराध्यक्ष माबुद बागवान, गटनेते श्रीराम बांगर यांच्यासह नगरसेवक सुमित कांबळे, साद अहेमद, रविंद्र वाढे, विशाल गोटरे आदींची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी कर्मचार्यांना सुचना करताना सांगितले की, कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व शिपाई यांनी कार्यालयात वेळेवर येणे व कार्यालयीन वेळ पुर्ण होईपर्यंत आपल्या विभागात हजर राहणे आवश्यक आहे. स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी दैनदिन साफसफाई नियमितपणे सुरु ठेवावी. शहरातील मुख्य रस्त्याची साफ-सफाई करून घ्यावी, सर्व स्वच्छता निरिक्षक यांनी आपआपल्या झोनमधील कर्मचार्यांची वेळ निश्चित करून हजेरी पट अध्यावत ठेवावे. कोणत्याही कर्मचार्यांची वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीशिवाय रजा मंजुर करू नये, शहरामध्ये ड्रेनेज लिक होणार नाही, याची काळजी घ्यावी.
पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचारी व वालमन यांनी नेमुन दिलेल्या प्रभागामध्ये नियमितपणे व वेळेवर पाणी सोडावे, तसेच पाणी वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. अनाधिकृत नळ जोडणी असल्यास ते तात्काळ बंद करावेत किंवा त्यांच्याकडून पाणी कर भरणा करून घेवून नळ जोडणी नियमित करावी. कर वसुली विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी जास्तीत जास्त वसुलीकडे लक्ष द्यावे. ज्या घरांना कर लावला गेला नाही अशा घरांना तात्काळ कर लावून त्यांची वसुली करावी. जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरीकांचे वेळेत काम करावे. नागरीकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
घरकुल योजनेच्या लाभार्थ्याकडे विशेष लक्ष देवून कोणताही कागदोपत्री अडथळा होणार नाही अशी माहिती देवून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यात यावी, त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. शहरामध्ये रस्त्यालगत अतिक्रमण वाढले आहे. सदरील अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करण्यात यावी. केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या नागरीकापर्यंत पोहचविता येतील याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे, आदी विषयावर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगरपरिषद कार्यालयातील उपमुख्याधिकारी , सर्व विभाग प्रमुख, सर्व अभियंता, नगररचनाकार, स्वच्छता निरीक्षक अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.