Hingoli Kasar Samaj: शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे, या उक्तीला सार्थ ठरवत सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज, हिंगोली यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि सामुदायिक धोंडे जेवणाचा कार्यक्रम
हिंगोली (Hingoli Kasar Samaj) : "शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे," या उक्तीला सार्थ ठरवत सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज, हिंगोली यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि सामुदायिक धोंडे जेवणाचा कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. श्री महाकालिका देवी मंदिर, महाकाली नगर, बळसोंड येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत झालेल्या या सोहळ्यास समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. अधिक मासाचे औचित्य आणि कुलदेवता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरचा पहिलाच अधिक मास असल्याने हा कार्यक्रम विशेष ठरला.
दहावी, बारावीच्या परीक्षेत तसेच विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या कासार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व मेडल देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पालकांचा देखील पुष्पहार व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांच्या यशाने पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मधील राधिका मिलिंद धाबे, श्रीपाद राध्येश्याम वानरे, संचित सचिन कंधारकर, पार्थ राहुल मेने, साईराज निलेश हलगे, श्रेया विलास मांगुळकर, आदित्य संतोष वराडे, अदिती आनंद मेने, विघ्नेश राजेश आहेर, राजनंदिनी नितीन आहेर, अनुजा अंबादास दहातोंडे, श्रीनंद पवन आहेर, प्रांजल महेश आहेर आणि अनुज संजय काठोळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उच्च शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साक्षी विनोद कानडे, अदिती अनिल आहेर, भक्ती रविंद्र धाबे तसेच क्रीडा क्षेत्रातील ऋषिकेश प्रकाश हलगे आणि निखिल श्रीधर कुसाट यांचाही गौरव झाला. याशिवाय श्री कालिकादेवी संस्थान, कुंभारी बाजार (परभणी) येथील निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी सृष्टी सचिन काठोळे, स्वरा सचिन भुजबळ आणि अनुजा अंबादासराव दहातोंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन पेदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवू नये, तर अशा कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन ध्येयवेडे बनावे. पाल्यांचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा सन्मान आहे." प्रमुख अतिथी ओमप्रकाश मेने, दादाराव भुजबळ, भगवानराव शीलवंत, चंद्रकांत कानडे, ओमप्रकाश धाबे आणि आभाना शिंदे महाराज यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंकज हलगे यांनी सूत्रसंचालन तर ओमप्रकाश धाबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित सामुदायिक 'धोंडे जेवणा'मुळे एकोप्याचे व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष गजानन पेदे, मंदिर विश्वस्त मंडळ, तरुण कार्यकर्ते आणि महिला कार्यकारिणी अध्यक्षा सौ. कल्पना ढोके यांच्या नेतृत्वाखालील महिला टीमने विशेष परिश्रम घेतले. संजय ढोके, सुरेश ढोके, बाळासाहेब कानडे, डॉ. आशिष झडपे, राध्येश्याम वानरे, राहुल मेने, डॉ. वेदांत मरळे, सौ. माया मरळे, सौ. वंदना पेदे, डॉ. प्रणिता झडपे आदींसह अनेक समाज बांधव-भगिनी उपस्थित होते. शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा देणारा कासार समाजाचा हा उपक्रम दिशादर्शक ठरला आहे.