एका महिलेचा मृतदेह नेण्याकरीता नातेवाईकाडे पैसे नसल्याने ५ हजार रुपये पाठविण्याची मागणी करून आपण स्वत:हा खंडवा रेल्वेचा जीआरपी एसएचओ असल्याचे भासवून फसविले.
रामवाडी येथील खुशबु मोहन पाटील या महिलेचा रेल्वे कटून मृत्यू झाल्याने मृतदेह नेण्यासाठी आईस बॅगची गरज असल्याचे भासवून क्युआर कोडद्वारे मागविले ५ हजार रुपये
हिंगोली (Fake Police Officer) : कळमनुरी तालुक्यातील एका महिलेचा मृतदेह नेण्याकरीता नातेवाईकाडे पैसे नसल्याने ५ हजार रुपये पाठविण्याची मागणी करून आपण स्वत:हा खंडवा रेल्वेचा जीआरपी एसएचओ असल्याचे भासवून एकास ५ हजार रुपयाने फसविल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास सदर भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांना ३ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास मोबाईल क्रमांक ९२४३१६८२१७ या नंबरवरून भ्रमणध्वनी आला. ज्यामध्ये संबंधीत मोबाईलधारकाने आपले नाव मनोजकुमार गुप्ता असल्याचे सांगून खंडवा रेल्वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगितले. कळमनुरी तालुक्यातील रामवाडी येथील खुशबु मोहन पाटील या महिलेचा रेल्वेने कटल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असून त्यांना मृतदेह नेण्याकरीता आईस बॅगची गरज असल्याचे सांगून ५ हजार रुपये पाठविण्याची विनंती केली. त्यामुळे हि बाब पोलिस निरीक्षक माकोडे यांनी कळमनुरी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव लक्ष्मण चौधरी यांना सांगितली. त्यामुळे चौधरी यांनी प्रेमकुमार गुप्ता यांनी पाठविलेल्या सिताराम कुर्मी या नावाच्या क्युआर कोडवर ५ हजार रुपयाची रक्कम पाठविली. त्यानंतर पोलिसांना काहीसा संशय आल्याने त्यांनी रामवाडी येथे खुशबु पाटील नावाची महिला आहे का? या बाबत विचारणा केली असता सदर नावाची महिला गावात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मनोजकुमार गुप्ता यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल लागला नाही. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे उघड झाले. त्यावरून ४ एप्रिल शनिवार रोजी कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोजकुमार गुप्ता याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत.