पूर्णा तालुक्यातील गौर गावात संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पूर्णा तालुक्यातील गौर येथील प्रकार जिल्हा कामगार अधिकार्यांच्या कार्यवाही कडे लक्ष
परभणी (Fake Death Certificates) : पूर्णा तालुक्यातील गौर गावात संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या 'बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा' लाभ घेण्यासाठी चक्क ४ जिवंत व्यक्तीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता सरकारी कामगार विभागाने लाभार्थ्यासह ग्रामसेवकांनाही नोटिसा बजावल्या आहेत, ज्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
गौर येथील सुरेखा जोगदंड, मीरा जोगदंड, पांचाळ व पारवे नामक ४ जिवंत व्यक्तीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. या चारही व्यक्तींनी यापूर्वीच बांधकाम कामगार मजूर म्हणून नोंद केलेली होती. सदर योजनेत एखाद्या बांधकाम मजुराचा काम करताना मृत्यू झाल्यास त्याला २ लाख रुपये अनुदान मिळते.नेमका याच योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेतून ही आर्थिक मदत लाटण्यात आली आहे. या घोटाळ्यामध्ये काही स्थानिक एजंट आणि काही कर्मचार्यांचे मोठं रॅकेट असून पिडीतांच्या म्हणण्यानुसार संबंधिन व्यक्तींनी आमचे आधार कार्ड आणि फोटो घेतले,त्यानंतर काही साहित्यही दिले. त्यानंतर काही लाख रुपये मिळतील असे सांगून त्यातील काही रक्कम तुम्हाला आणि बाकी आम्हाला द्यावे लागतील, असेही सांगण्यात आले. त्यानंतर काही प्रमाणात हा व्यवहार झाल्या चे समजते. मात्र ज्या कागदपत्रांच्या आधारे हा लाभ मिळाला त्यात आपल्याला 'मृत' दाखवण्यात आले आहे हे समजताच लाभार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर मृत्यू बाबत अधिक तपासा करता संबंधित विभागाने ग्रामपंचायत कार्यालयाला नोटीस देऊन संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची खातरजामा करण्यास सांगितले व मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही वितरित केले आहेत का? अशी विचारणा केली असता संबंधित व्यक्ती जिवंत असून तसे मृत्यू प्रमाणपत्र गौर ग्रामपंचायत कार्यालयाने वितरित केलेले नाहीत असं संबंधीत विभागाला कळवलं आहे.
मागील अनेक वर्षापासून, बोगस लग्न प्रमाणपत्र दाखवणे, बोगस दिव्यांग लाभार्थी दाखवणे, मयत लाभार्थी दाखवून एजंट व अधिकारी यांनी शासनाला करोडो रुपयाचा चुना लावला आहे. त्यामुळे संबंधितांवर जिल्हा कामगार अधिकारी कराड हे कोणती कार्यवाही करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित प्रकरणाशी ग्रामपंचायत कार्यालयाचा काहीही संबंध नसून खोटी स्वाक्षरी बनावट स्टॅम्प बनवून हीं प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. सदरील प्रमाणपत्र आम्ही वितरण केलेले नाहीत. हा सर्व प्रकार करणार्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. - श्रीमती ए.आर. लाडेकर, ग्राम विकास अधिकारी, गौर.