नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (३ एप्रिल) उशिरा रात्री भीषण अपघात घडून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दिंडोरीत एकाच कुटुंबावर काळाचा घाला
(Car Fell In Well) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात शुक्रवारी (३ एप्रिल) उशिरा रात्री भीषण अपघात घडून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगात धावणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्यालगत असलेल्या खोल, पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेत राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे यांच्यासह दरगोडे कुटुंबातील आणखी चार नातेवाईकांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या काळजाचा ठाव घेणाऱ्या घटनेमुळे इंदोरे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुका हादरून गेला आहे.

स्नेहसंमेलनानंतर घरी परतताना दुर्घटना
प्राथमिक माहितीनुसार, मृत सर्वजण इंदोरे गावचे रहिवासी होते. ते एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. रात्री उशिरा घरी जात असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्यामुळे गाडीतून बाहेर पडण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. त्यामुळे सर्वांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मदतीसाठी धावले नागरिक, पण सर्व निष्फळ
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलालाही कळवण्यात आले. काही वेळातच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. मात्र कार बाहेर काढल्यानंतर त्यामधील सर्व प्रवासी मृत अवस्थेत आढळून आले. ही घटना पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले.
सुरक्षेअभावी संताप
या अपघातानंतर विहिरीभोवती कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. विहिरीचा कठडा अत्यंत कमी उंचीचा असल्याने आणि परिसरात कोणतेही संरक्षक जाळे किंवा भिंत नसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल, तपासाला वेग
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी विहीर मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची चौकशी सुरू असून रस्ता आराखडा, विहिरीचे स्थान आणि सुरक्षाव्यवस्था यांची तपासणी केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आनंदाचे क्षण दुःखात बदलले
दरम्यान, स्नेहसंमेलनासाठी सजलेल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या घटनेने अधिकच वेदना वाढवल्या आहेत. काही तासांपूर्वी आनंदात सहभागी झालेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही दुर्घटना केवळ अपघात नसून सुरक्षेतील त्रुटींचा गंभीर इशारा असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.