Social Equality Week: बुलढाण्यात 8 ते 14 एप्रिलदरम्यान 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येत आहे. शासकीय योजना, सामाजिक जनजागृती व संविधानाच्या मूल्यांचा प्रसार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
चिखली (Social Equality Week) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात दि. 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. समाजातील वंचित, दुर्बल घटकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवणे, सामाजिक समतेची जाणीव निर्माण करणे आणि संविधानातील मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी दिली.
या (Social Equality Week) सप्ताहाची सुरुवात पत्रकार परिषदेतून करण्यात आली असून संपूर्ण आठवडाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात समतेचा संदेश पोहोचवण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. दि. 9 एप्रिल रोजी शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये निबंध, वक्तृत्व व लघुनाट्य स्पर्धांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व संवेदनशीलता वाढवण्यावर या उपक्रमांचा भर राहणार आहे.
दि. 10 एप्रिल रोजी ‘समतादूत’ पथनाट्यांच्या माध्यमातून ‘मार्जिन मनी’ योजनेसह इतर शासकीय योजनांचे प्रभावी प्रबोधन केले जाणार आहे. गावागावात जाऊन नागरिकांना थेट संवादातून माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दि. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून ‘संविधान जागर’ अभियानांतर्गत भारतीय संविधानाची माहिती देणारे मार्गदर्शन सत्र तसेच महिला मेळावे घेण्यात येणार आहेत. महिला सक्षमीकरण आणि हक्कांविषयी जनजागृती हा या दिवसाचा मुख्य केंद्रबिंदू असेल.
दि. 13 एप्रिल रोजी शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळांमध्ये रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे आरोग्य, स्वच्छता आणि शासकीय सेवांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे. तर दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्रे व अभिवादन कार्यक्रम पार पडणार आहेत. संविधानातील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा पुनरुच्चार या कार्यक्रमातून केला जाणार आहे.
या (Social Equality Week) सप्ताहादरम्यान विविध शासकीय योजनांबाबत माहितीपत्रके वाटप, मार्गदर्शन शिबिरे, तसेच लाभार्थी नोंदणी उपक्रमही राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. ‘सामाजिक समता सप्ताह’ हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाजमनात परिवर्तन घडवून आणणारा उपक्रम ठरावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून या माध्यमातून जिल्ह्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.