जिल्ह्यात सध्या पीक कर्जमाफीचे वारे वाहू लागले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३५० कोटींच्या वर वसूली
यवतमाळ (Agriculture Finance) : जिल्ह्यात सध्या पीक कर्जमाफीचे वारे वाहू लागले आहेत. त्याबरोबर नियमित कर्जभरणा करणार्या शेतकर्यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत केली होती. तर माजी मंत्री बच्चू कडू यांनी नियमित कर्ज भरणा करणार्या शेतकर्यांना दीड लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. आज बिनव्याजी पीक कर्ज भरणा करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे शेतकरी सभासदांनी ३५० कोटींच्या वर कर्ज भरणा केला असून वृत्त लिहिपर्यंत अंतिम आकडेवारी समोर आली नव्हती.
जिल्ह्यात २ लाख ३२ हजार शेतकर्यांमध्ये १८५७ कोटी रूपयांची पीक कर्जाची थकबाकी आहे,त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १ लाख ३२ हजार ११९ शेतकर्यांकडे १४०१ कोटींचे पीक कर्ज थकित आहे. तर वर्ष २०२५-२६ मध्ये १ लाख २८ हजार ९४४ शेतकर्यांकडे १४७० कोटींचे चालू स्वरूपातील कर्ज आहे. यामध्ये शासकीय बँकांकडून ६१ हजार १४६ शेतकर्यांना ७११ कोटी ७९ लाख रूपये,खासगी बँकांकडून २ हजार ८४८ शेतकर्यांना ६७ कोटी ६५ लाख रूपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५१ हजार २५० शेतकर्यांना ४७२ कोटी ३ लाख रूपये,महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून १० हजार ७३७ शेतकर्यांना १५७ कोटी ६० लाख रूपये असे एकूण १४०९ कोटी रूपयांचे कर्ज वाटप वर्ष २०२५-२६ च्या खरीप हंगामाध्ये करण्यात आले होते. नियमित खातेदारांना पीक कर्जाचा शून्य व्याजदराने भरणा करण्याची आजची शेवटची तारीख होती.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वाधिक शेतकरी सभासद असणारी बँक असून कालपर्यंत ३३० कोटीचा कर्ज भरणा शेतकर्यांकडून करण्यात आला होता, आजही मोठया प्रकरणावर शेतकर्यां कडून कर्ज परतफेड करण्यात आली असून कर्ज परतफेडीची अंतिम आकडेवारी वृत्त लिहिपर्यंत मिळू शकली नाही.