Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आणखी

एआयचा रोजगारावर प्रभाव

एआयमुळे रोजगारावर संकट की संधी, तज्ज्ञांचे मतभेद

एआयच्या वाढत्या प्रभावामुळे रोजगाराच्या स्वरूपात महत्वाचे बदल होत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, एआय नोकऱ्या घेऊन जाईल, तर काहींच्या मते, ती नवीन संधी निर्माण करेल.


एआयमुळे रोजगारावर संकट की संधी तज्ज्ञांचे मतभेद

एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) नोकऱ्या खाऊन टाकेल का, या प्रश्नावर आता तंत्रज्ञान क्षेत्रातच मतभेद स्पष्ट दिसू लागले आहेत. एआय कंपनी Anthropic मध्येच वरिष्ठ स्तरावर याबाबत वेगवेगळी मते समोर आली आहेत.

कंपनीचे सीईओ Dario Amodei यांनी एआयमुळे मोठ्या प्रमाणावर व्हाईट-कॉलर नोकऱ्यांना धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, पुढील पाच वर्षांत सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक नोकऱ्या कमी होऊ शकतात. बेरोजगारी दर १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असेही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

याच मुद्द्यावर दावोस येथील World Economic Forum परिषदेतही त्यांनी सरकारांच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तंत्रज्ञान, वित्त, कायदा आणि सल्लागार क्षेत्रांवर एआयचा सर्वाधिक परिणाम होईल, असा त्यांचा दावा आहे.

मात्र, अँथ्रोपिकचे ग्रोथ हेड Amol Avsare यांनी या दाव्याला छेद दिला आहे. त्यांच्या मते, एआय कंपन्या माणसांची जागा घेऊ शकत नाहीत. उलट, एआयमुळे अधिक लोकांना कामावर ठेवण्याची गरज निर्माण होत आहे.

ते म्हणाले की, कंपनी सध्या प्रॉडक्ट मॅनेजर्ससाठी सक्रियपणे भरती करत आहे. ‘क्लॉड कोड’सारख्या एआय टूलमुळे इंजिनिअरिंग आउटपुट तिपटीने वाढले असले, तरी त्याचे नियंत्रण आणि दिशा माणसांकडूनच ठरवली जाते. त्यामुळे प्रॉडक्ट मॅनेजमेंट, डिझाइन आणि संशोधन क्षेत्रात मनुष्यबळाची गरज अधिक वाढत आहे.

अँथ्रोपिकच्या संशोधनानुसार, एआयचा सर्वाधिक प्रभाव संगणक प्रोग्रामिंग क्षेत्रावर दिसून आला असून, सुमारे ७४.५ टक्के काम एआयद्वारे केले जात आहे. ग्राहक सेवा आणि डेटा एन्ट्री क्षेत्रावरही त्याचा मोठा परिणाम आहे.

तथापि, एआयची सैद्धांतिक क्षमता ९४ टक्क्यांपर्यंत असली, तरी प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये त्याचा वापर केवळ सुमारे ३३ टक्क्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे आढळले आहे. कायदेशीर, प्रशासन आणि वित्त विभागांमध्येही एआयच्या क्षमते आणि प्रत्यक्ष वापरात मोठी तफावत दिसून येते.

दरम्यान, ChatGPT सारख्या एआय टूल्सच्या आगमनानंतर २२ ते २५ वयोगटातील कर्मचाऱ्यांच्या भरतीत सुमारे १४ टक्क्यांची घट झाल्याचेही समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, एआयमुळे नोकऱ्या पूर्णपणे नष्ट होणार नाहीत, तर कामाचे स्वरूप बदलणार आहे. एआयच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न अधिक असल्याचेही आढळले आहे. तसेच, उच्च शिक्षित आणि कौशल्याधारित कामगारांची मागणी वाढत आहे.

एकीकडे एआयमुळे रोजगारावर संकट येईल, असा इशारा दिला जात असताना, दुसरीकडे त्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एआयच्या युगात नोकऱ्या नाहीशा होण्यापेक्षा त्यांचे स्वरूप बदलणार, हेच वास्तव अधिक स्पष्ट होत आहे.

Related to this topic: