बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या विवाहामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
तिसऱ्या लग्नावरून सुरू असलेल्या वादावर आमिर खानचं स्पष्टीकरण; कुटुंबाच्या पुरोगामी विचारांचा दिला दाखला
मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या विवाहामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अलीकडेच त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्याशी विवाह केला. या विवाहानंतर काही राजकीय नेते आणि हिंदू संघटनांकडून त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चे आरोप करण्यात आले असून, या सर्व आरोपांना आमिर खानने आता स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.
एका मुलाखतीत आमिर खानने आपल्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांचे कुटुंब नेहमीच पुरोगामी आणि सर्वसमावेशक विचारांचे राहिले आहे. त्याच्या दोन्ही बहिणींनी हिंदू पुरुषांशी विवाह केला असून, त्याची मुलगीही हिंदू व्यक्तीशी विवाहबद्ध झाली आहे. तसेच त्याचा चुलतभाऊ मन्सूर याने ख्रिश्चन महिलेशी विवाह केला असल्याचेही त्याने नमूद केले.
आमिर खानने सांगितले की, गौरी स्प्रॅट, रीना दत्ता आणि किरण राव यांनी त्याच्याशी विवाह करताना कोणताही धर्म स्वीकारलेला नाही. हे सर्व विवाह सिव्हिल सेरेमनीद्वारे कायदेशीर नोंदणी पद्धतीने झाले आहेत. त्याने पुढे स्पष्ट केले की, गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. ती ख्रिश्चन असली तरी धार्मिक विधींचे काटेकोर पालन करत नसल्याचेही त्याने सांगितले.
आमिर खानच्या तिसऱ्या विवाहानंतर मंत्री नितेश राणे यांनी त्याला 'लव्ह जिहादचा ब्रँड अॅम्बेसेडर' असे संबोधले होते. याशिवाय, बजरंग दलसह काही हिंदू संघटनांनीही त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चे आरोप केले आहेत. तसेच, त्याच्याविरोधात फतवा जारी करण्यात आल्याचीही चर्चा आहे.
याच मुलाखतीत आमिर खानने मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल परिसरातील सुमारे 100 कोटी रुपयांच्या मल्टी-जेनरेशनल स्कायविला संदर्भातील चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, त्यांच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचा पुनर्विकास सुरू असून हा निर्णय हाऊसिंग सोसायटीने सामूहिकरीत्या घेतला आहे. या सोसायटीत स्वतः आमिर खानसह एकूण 24 सदस्य असून, त्यामध्ये एका बिल्डरचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स खरेदी केल्यामुळे इमारतीचा मोठा भाग त्या बिल्डरच्या मालकीचा असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याशी झाले होते. त्यांना जुनैद आणि इरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याने किरण राव यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला आझाद नावाचा मुलगा आहे. 5 जुलै रोजी आमिर खानने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत गौरी स्प्रॅटसोबत तिसरा विवाह केला. गौरी व्यवसायाने उद्योजिका असून, तिचेही हे दुसरे लग्न आहे. तिच्या पहिल्या विवाहातून तिला सात वर्षांचा मुलगा आहे.