भरधाव वेगातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोघांचा मृत्यू; अनेक जखमी, एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर
गडचिरोली (Gadchiroli Accident) : गडचिरोली आगाराची एसटी महामंडळाची बस क्रमांक MH 14 - 0741 ही सकाळी 7.15 वाजता गडचिरोलीवरून उमरखेडकडे रवाना झाली होती. मात्र शहराबाहेर पडताच नवेगाव-मुरखळा गावांनजीक बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, आमदार डॉ. नरोटे रुग्णालयात पोहोचले असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या. अपघातातील गंभीर जखमींवर उपचार सुरू आहे. भीषण अपघातामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.