CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात जपानच्या जायका संस्थेने ३७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता देण्याचे जाहीर केले, ज्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सुधारण्यास मदत होईल.
जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता
मुंबई (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्राच्या विकास प्रवासात विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या (जायका) या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत आता वैद्यकीय क्षेत्रातही सहकार्याची नवी दिशा निर्माण होणार आहे. राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी जायका महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यास उत्सुक असून ३ हजार ७०८ कोटींची वित्तीय सहाय्यता घेण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, यापूर्वी आसाम आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर, जायका आता महाराष्ट्रातही ¬‘मेडिकल केअर सिस्टम’ मजबूत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. विशेषतः राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत समन्वय साधून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रस्तावित भागीदारीत खालील महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, सध्याच्या शासकीय वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक निदान (डायग्नोस्टिक) यंत्रणा अधिक सक्षम करणे विशिष्ट आजारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणे. नवीन नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांची स्थापना करून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे. आरोग्य व्यवस्थापन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सहाय्य, राज्य सरकारच्या वतीने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, वैद्यकीय शिक्षण विभागाने आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शविली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय जळगांव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदूरबार व गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये १०० प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व संलग्नित रूग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरिता तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी, याकरिता ‘स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलीव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम ॲण्ड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून ३ हजार ७०८ कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या प्रकल्पात वर्धा, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसेच मुंबईतील जीटी, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी, पालघर, धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. तर बारामती, सांगली (मिरज), कोल्हापूर येथील नर्सिंग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याशिवाय अहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, नाशिक, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी, वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत रूग्णालय व्यवस्थापन व प्रशासन मानवसंसाधन विकास यांच्या क्षमता वृध्दीसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक होईल .त्यामुळे राज्यातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. एकूणच, जायका आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील ही प्रस्तावित भागीदारी आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे ही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.