Tehsildar Pratiksha Tejankar: रिसोड तालुक्यातील मोप येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना रस्त्याचा हक्क सुनिश्चित केला.
रिसोड (Tehsildar Pratiksha Tejankar) : रिसोड तालुक्यातील मोप येथे तहसील प्रशासनाच्या पुढाकारातून शेतकऱ्याला हक्काचा रस्ता मिळाल्याची सकारात्मक घटना घडली आहे. या प्रकरणात तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी पुढाकार घेत प्रभावी मार्गदर्शन करत दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधला आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सामंजस्यातून सोडवला. मोप येथील गट क्रमांक 405 मधील पंढरी हरिभाऊ नरवाडे व इतर चार अर्जदार तसेच गैरअर्जदार संतोष त्र्यंबक गवई यांची पंचायत समक्ष उपस्थिती लावण्यात आली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या सूचनांनुसार मंडळ अधिकारी व तलाठी यांनी गावातील पंच व महसूल कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष मौका पाहणी केली. पाहणीदरम्यान गट क्रमांक 405 मधून मोप ते रिसोड रस्त्याला जोडणारा आणि पुढे कन्हेरीकडे जाणारा मार्ग असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी गैरअर्जदार संतोष त्र्यंबक गवई यांनी नकाशाप्रमाणे रस्ता देण्यास सहमती दर्शवली, तर अर्जदारांनीही पंचायत समक्ष संमती दिली. त्यानंतर पंचनामा करून संबंधित शेतरस्ता सामंजस्यातून मोकळा करण्यात आला. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वामुळे व समन्वय कौशल्यामुळे हे प्रकरण कोणताही वाद न होता मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मंडळ अधिकारी एस. बी. जाधव, ग्राम महसूल अधिकारी पि. के. निरफळे तसेच पंढरी हरिभाऊ नरवाडे, उत्तम गणपत गिरे, रामेश्वर वामनराव नरवाडे, संतोष भगवान नरवाडे, मधुसदन शिकवाल, सखाराम नरवाडे, अशोक माधव नरवाडे, रामराव वामनराव नरवाडे, हरिसकिशन सिकची, राजाराम गीते आदींची उपस्थिती होती.