हिंगोली (Hingoli District Drought) : एल निनो'चा इशारा आणि अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाने गाठलेली सरासरी या फेऱ्यात जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व तूर, या मुख्य पिकांसह इतरही ही पिके धोक्यात आली आहेत. पावसाळ्याच्या दिवसांतील ४० दिवसांचा खंड पिकांच्या मुळावर उठला असून उत्पादनाची सरासरी चाळीस टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात २ लाख ६८ हजार ८०३ हेक्टर पेरणीक्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख २४ हजार ७७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. पेरणीचे प्रमाण सरासरी ९१.५६ टक्के आहे.
मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा दोन लाख ५१ हजार ९२० हेक्टर, कापूस ३२ हजार ५८६ हेक्टर, तर तूर ३९ हजार ९२५ हेक्टरमध्ये आहे.मक्याची पेरणी ९४८ हेक्टरमध्ये झाली आहे. शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणाऱ्या या पिकांची सद्यस्थिती अतिशय वाईट असून सर्वच पिकांमध्ये मोठी घट येण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
जूनच्या सुरुवातीला पाऊस अत्यंत कमी होता. जिल्ह्यातील ३० पैकी २९ महसूल मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. (Hingoli District Drought) जूनच्या अखेरीस पावसाने थोडी गती घेतली आणि महिनाअखेरपर्यंत एकूण १७२.८ मिमी पाऊस नोंदवला गेला, जो जूनच्या सरासरीच्या (२०६.३ मिमी) तुलनेत ८३.८ टक्के होता. जुलै महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक आणि चांगला पाऊस झाला. या महिन्यातील पावसामुळे खरिपाची पिके जोमात आली होती.ऑगस्ट महिना शेतकऱ्यांसाठी अत्यंत चिंतेचा ठरला. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने तीव्र दडी मारल्यामुळे पावसाचा मोठा खंड पडला ऑगस्टमध्ये तब्बल ७२ टक्के पावसाची तूट निर्माण झाली.
जिल्ह्यातील पीक परिस्थिती बघता कापसाच्या पिकात ३० ते ४० टक्के, तर सोयाबीन ६० ते ७० टक्के नुकसान होण्याचा अंदाज आहे.आधी बोगस बियाण्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यानंतर पावसाने खंड दिल्याने सोयाबीनचे पीक गेले आहे. आतासुद्धा पाऊस झाल्यास कपाशी व तूर वाचू शकते. शेतीचा खर्च प्रचंड झाल्याने शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे.