डोळ्याजवळ, कानाला,इतर ठिकाणी गंभीर दुखापत...!
परभणी (Stray Dog Attack) : जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरातील जमीर कॉलनी येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी बालिकेवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीशा फिरोज खान (वय साडेतीन वर्षे) ही बालिका घरासमोर खेळत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला चढविला. कुत्र्याने बालिकेच्या डोळ्यजवळ, थुडीजवळ तसेच कानाजवळ चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यामुळे बालिकेच्या चेहऱ्यावर खोल जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिक व युवकांनी तत्काळ धाव घेत कुत्र्याला दूर हुसकावून लावले आणि जखमी बालिकेला उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. उम्मेकुलसूम खाजा मजीद यांनी बालिकेवर तातडीने प्राथमिक उपचार केले. जखमांचे स्वरूप गंभीर असल्याने पुढील विशेष उपचारासाठी तिला परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य बाजारपेठ, शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक मैदाने आणि रहिवासी वसाहतींमध्ये कुत्र्यांचे कळप मुक्तपणे फिरताना दिसून येतात.
यापूर्वीही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या (Stray Dog Attack) घटना घडल्या असून, नगर परिषद प्रशासनाने कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी एकदाच काही ठिकाणी नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांनवर कारवाई केली त्यानंतर नगर परिषदेला विसर पडला का असा सवाल संतप्त नागरिक करत आहे.