परभणी जप्त रेती उपसा

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction

 

भरदुपारी लोखंडी पाइप कापून बोलेरोतून साहित्य नेल्याचा प्रकार 

‘देशोन्नती’च्या हाती व्हिडिओ 

जिंतूर (Parbhani Illegal sand extraction) : अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार रविवार २७ सप्टेंबर रोजी जिंतूर तहसील कार्यालयाच्या आवारात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ दैनिक ‘देशोन्नती’च्या हाती लागला आहे.

दुपारी १२ वाजता बोलेरो वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात आले. त्यानंतर काही व्यक्तींनी जप्त रेती उपसा बोटीजवळ जाऊन कटरच्या सहाय्याने लोखंडी पाइप कापल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कापलेले पाइप व इतर अवजड साहित्य तीन-चार व्यक्ती बोलेरो वाहनात भरून नेत असल्याचेही चित्रणात दिसून येते.तहसील कार्यालयाच्या आवारातच जप्त मालमत्तेचे साहित्य कापून नेले जात असल्याने जप्त वाहनांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित साहित्य नेण्यासाठी प्रशासनाची परवानगी होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. जिंतूर तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैध रेती उपशाच्या कारवाईत जप्त केलेली अनेक वाहने व बोटी दीर्घकाळापासून पडून असल्याची माहिती आहे.

काही वाहने सुमारे दहा वर्षांपासून आवारात असल्याचे सांगितले जाते. लिलाव अथवा विल्हेवाटीची प्रक्रिया रखडल्याने जप्त मालमत्तेची अवस्था खराब होत आहे.या प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि बोलेरो वाहनाच्या माहितीच्या आधारे चौकशी करून संबंधितांची ओळख पटवावी, अशी मागणी होत आहे. जप्त साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती, तसेच साहित्य कापून नेण्यासाठी परवानगी होती का, याचा खुलासा महसूल प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे.

व्हिडिओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
जप्त मालमत्ता तहसील कार्यालयाच्या आवारात असतानाच तिचे लोखंडी भाग कापून नेल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे जप्त साहित्याच्या सुरक्षेची व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख आणि संबंधित कर्मचार्‍यांच्या जबाबदारीची चौकशी होणे आवश्यक ठरते. वर्षानुवर्षे पडून असलेल्या जप्त वाहनांचा लिलाव कधी होणार, हादेखील प्रश्न कायम आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित तलाठ्यांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. घटनेची आवश्यक ती चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-शीतल कच्छवे, तहसीलदार