परभणी रेल्वे शेतकरी विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest

 

स्थळ पाहणीस आलेल्या अधिकार्‍यांना घेराव

पेट्रोलची बाटली, दोर दाखवताच पथक माघारी 

पूर्णा (Parbhani Railway Farmers Protest) : चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांनी मंगळवार २९ सप्टेंबर रोजी तीव्र विरोध केला. पूर्णा-पांगरा रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर शेतकर्‍यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. काही शेतकर्‍यांनी हातात पेट्रोलची बाटली व दोर घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर स्थळपाहणी न करताच अधिकार्‍यांना माघारी परतावे लागले.

प्रस्तावित रेल्वे बायपासचा मार्ग बरबडी, आडगाव व गौर या तीन गावांतील सुमारे ५६ शेतकर्‍यांच्या शेतजमिनीतून जाणार असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थितीतही शेतीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असून, जमीन गेल्यास उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. स्थळ पाहणीसाठी वरिष्ठ-कनिष्ठ अभियंते, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. मात्र, शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केल्याने पथकाला पाहणी न करताच परतावे लागले.

प्रस्तावित मार्गाचे व्हिडिओ चित्रीकरण होणार
दरम्यान,प्रस्तावित मार्गात येणार्‍या विहिरी, बोअर, पाइपलाइन, झाडे, गोठे व घरांचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. हे चित्रीकरण वरिष्ठ अधिकार्‍यांकडे सादर करून त्यानुसार मोबदल्याबाबत कार्यवाही केली जाईल. यासाठी इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी साक्षीदार म्हणून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   
- प्रवीणकुमार मोसू घंटी, असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर 

‘आधीच रेल्वे मार्ग गेला, पुन्हा जमीन देणार नाही’
गौर येथील शेतकरी राजकुमार जोगदंड यांनी सांगितले की, त्यांच्या गट क्रमांक ४४६ मधून यापूर्वीच रेल्वे मार्ग गेला आहे. त्याच जमिनीतून पुन्हा बायपास गेल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. आडगाव येथील शेतकरी विठ्ठल भोरे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एक हेक्टर जमीन असून त्यापैकी तब्बल ५५ आर जमीन बायपाससाठी गेल्यास उर्वरित जमिनीवर काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.