चार दिवसात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गंगाखेडच्या साळवे परिवारावर दु:खाचा डोंगर
गंगाखेड (Parbhani Brothers Death) : मोठ्या भावाच्या निधनाचे दुःख ताजे असतानाच अवघ्या चार दिवसांनी लहान भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर नगर परिसरात घडली. या घटनेने साळवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात कार्यरत सुरेश भानुदास साळवे वय ४७ वर्ष,यांचे गुरुवार २४ सप्टेंबर रोजी न्युमोनिया आजाराने निधन झाले होते. मोठ्या भावाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचे सावट असतानाच त्यांचा लहान भाऊ राहुल साळवे याचीही प्रकृती अचानक खालावली. रविवार २७ सप्टेंबर रोजी त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवार २८ सप्टेंबर रोजी पहाटे १२.०४ वाजता त्यांचेही निधन झाल्याने डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले.
एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या चार दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि परिचितांवरही शोककळा पसरली आहे. आंबेडकर नगर परिसरासह शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोठ्या भावाच्या निधनानंतर कुटुंबीय दुःखातून सावरत असतानाच लहान्या भावाच्या निधनाची वार्ता आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा आणखी मोठा आघात झाला. या प्रकरणी चंद्रमनी भानुदास साळवे वय ४० वर्ष यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याचा पुढील तपास पोह मारोती माहोरे हे करीत आहेत.