कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे.
मुंबई (Tukaram Munde) : कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ही तब्बल २५ वी बदली ठरली असून या नियुक्तीची प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे.
दीड महिन्यांपूर्वीच त्यांची आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली झाली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनासारख्या अत्यंत संवेदनशील विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. औषध नियंत्रण, अन्न सुरक्षा आणि बाजारातील गुणवत्ता तपासणीसारख्या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित हा विभाग असल्याने या नियुक्तीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
मुंढे यांनी २००५ मध्ये सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील विविध जिल्हे, महानगरपालिका आणि शासकीय विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करत व्यापक अनुभव मिळवला आहे. जालना जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त तसेच नागपूर महापालिका आयुक्त अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत.
त्याचप्रमाणे त्यांनी नियोजन विभाग, आरोग्य सेवा संचालनालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मानवाधिकार आयोगाशी संबंधित कार्य आणि विविध सामाजिक-आर्थिक विभागांमध्येही सेवा बजावली आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रशासनात पारदर्शकता आणणे, नियमांचे काटेकोर पालन आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई यावर विशेष भर राहिला आहे.

बदल्यांची दीर्घ यादी आणि प्रशासकीय प्रवास
२००५ ते २०२६ या कालावधीत मुंढे यांनी जवळपास सर्व प्रमुख प्रशासकीय क्षेत्रांमध्ये काम केले आहे. उपजिल्हाधिकारी ते आयुक्त आणि सचिव स्तरापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. त्यांचा प्रशासकीय प्रवास खालीलप्रमाणे राहिला आहे:
तुकाराम मुंढे यांची २००५ पासून आतापर्यंत कुठे कुठे बदली झाली?
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
जून 2010 - सीईओ, कल्याण.
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 - असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025 - दिव्यांग कल्याण विभाग
मार्च 2026 - आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग
मे 2026 - अन्न आणि औषध प्रशासन विभाग
FDA विभागावर अपेक्षा वाढल्या
अन्न व औषध प्रशासन विभागात औषध विक्री, अन्न सुरक्षा मानके, लायसन्सिंग आणि तपासणी यासारख्या अत्यंत संवेदनशील जबाबदाऱ्या येतात. या विभागात पारदर्शकता वाढवणे, बोगस औषधांवर कारवाई करणे आणि अन्न सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करणे ही मोठी आव्हाने मानली जातात. मुंढे यांच्या नियुक्तीनंतर या विभागात कठोर अंमलबजावणी आणि तपासणी मोहिमा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक तीव्र होईल, अशीही चर्चा प्रशासन वर्तुळात आहे. दरम्यान, त्यांच्या वारंवार बदल्यांवरून पुन्हा एकदा प्रशासकीय धोरणांवर चर्चा सुरू झाली असून, त्यांच्या पुढील कार्यपद्धतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.