Risod Municipal Council: रिसोडच्या 'सिव्हिल लाईन' रस्त्यावरील अंधारावर मात करत प्रशासनाने नवीन पथदिव्यांची उभारणी केली, नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण.
मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्या पुढाकाराने मुख्य रस्ता झळाळला!
नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
रिसोड (Risod Municipal Council) : शहरातील अत्यंत गजबजलेला आणि मध्यवर्ती समजला जाणारा 'सिव्हिल लाईन' हा मुख्य रस्ता अनेक दिवसांपासून अंधारात चाचपडत होता. मात्र, प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे आणि तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे या रस्त्यावर आता अखरे प्रकाशाची नवी पहाट उगवली आहे. नवीन पथदिव्यांच्या (Street Lights) प्रकाशामुळे हा परिसर उजळून निघाला आहे.
अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या स्ट्रीट लाईट समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावला आहे. सिव्हिल लाईन हा रिसोड शहराचा मुख्य व अत्यंत गजबजलेला मार्ग मोठ्या प्रमाणात व्यापारी व्यवहारही चालतात. मात्र, रात्रीच्या वेळी या रस्त्यावर पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव असल्यामुळे अपघातांची भीती कायम होती. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता, तर व्यापाऱ्यांनाही व्यवसायात अडथळे निर्माण होत होते.
या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापारी वर्गाने (Risod Municipal Council) रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांच्याकडे वारंवार निवेदन देत समस्या मांडली. मुख्याधिकारी शेवदा यांनी या प्रश्नाला प्राधान्य देत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. या कामासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी त्यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच माजी खासदार अनंतराव देशमुख आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे मान्यता व निधीसाठी सतत प्रयत्न केल्याने आज सिव्हिल लाईन रस्ता प्रकाशमय झाला असून संपूर्ण परिसरात उजेडाची लखलख दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून प्रशासनाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे.
मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी या कामासाठी घेतलेली पुढाकाराची भूमिका विशेष ठरली. त्यांनी केवळ समस्या ऐकून न घेता तिचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवर पाठपुरावा केला, ही बाब प्रशंसनीय मानली जात आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे शहरातील इतर विकासकामांबाबतही नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
प्रशासकीय इच्छाशक्तीचे दर्शन:
सिव्हिल लाईन सारख्या मुख्य रस्त्यावरील अंधाराचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळला होता. मात्र, मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी शहरातील प्रलंबित नागरी सुविधांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. सिव्हिल लाईनच्या पथदिव्यांबाबत तक्रारी प्राप्त होताच, त्यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन 'डेडलाईन' निश्चित केली होती. प्रशासकीय काळात निधी व मान्यता मिळाल्याने आज हा रस्ता उजळून निघाला आहे. पुढील काळातही शहराच्या विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा उभारण्यावर भर राहील.
"सिव्हिल लाईन रस्त्यावर अंधार असल्याने रात्रीच्या वेळी व्यापार आणि वाहतुकीवर परिणाम होत होता. आता दिवे लागल्यामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाचे हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.
-मंचकराव देशमुख नागरिक
मुख्याधिकाऱ्यांच्या या कार्यतत्परतेमुळे प्रशासकीय यंत्रणेत एक नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. "अधिकारी जर कर्तव्यदक्ष असेल, तर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागत नाही." अशा शब्दांत रिसोडकरांनी सतीश शेवदा यांचे आभार मानले आहेत. सिव्हिल लाईन आता केवळ 'लाईट' मुळेच नाही, तर प्रशासनाच्या 'सकारात्मक कामा'मुळे प्रकाशमान झाली आहे.