शहराच्या मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम केल्याने बाजारपेठेतील रस्ते अरुंद झाले आहेत.
अपघाताचा वाढला धोका, मुख्याधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज
देसाईगंज (Illegal Encroachment) : शहराच्या नगर विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३२ अशी नोंद असलेल्या व आठवडी बाजारासाठी आरक्षित असलेल्या जागेवर विनापरवानगी अनाधिकृत पक्के बांधकाम करणार्या तब्बल ६० बांधकाम धारकांना १७ मे २०२१ रोजी अनाधिकृत बांधकाम काढुन टाकण्या संदर्भात नोटीस बजावण्यात आले होते.सदर अतिक्रमण नोटीस बजावल्यापासुन तीन दिवसाच्या आत काढण्यात न आल्यास नियमानुसार बजावण्यात आले होते.मात्र तत्कालीन स्थितीत मुख्याधिकारी डॉ.कुलभुषण रामटेके कार्यरत असताना कुठलिच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे अतिक्रमण धारकांचे चांगलेच मनोबल वाढल्याने शहराच्या अनेक भागात अनाधिकृत अतिक्रमणाचा रहदारीसह चक्क शासकीय बांधकामांना फटका बसु लागला आहे. दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली समस्या मुख्याधिकारी सतिश चौधरी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन मार्गी लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण धारकांनी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकाम केल्याने बाजारपेठेतील रस्ते अरुंद झाले आहेत. शेतकर्यांसह किरकोळ सब्जी भाजी विक्रेत्यांना सब्जी भाजी विक्रीसाठी जागाच शिल्लक नसल्याने चक्क रस्त्यावर सब्जी भाजी विक्री करावी लागत आहे.यामुळे आवागमनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागला असुन तासनतास वाहतूक खोळंबत असल्याने दुकानदार आणि सब्जी भाजी विक्रेत्यांना बाचाबाची नित्याची बाब झाली आहे.
कोरोना कालावधीत सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आल्याने याचा गैरफायदा घेत बाजारातील अतिक्रमण धारकांनी अनाधिकृत बांधकाम करण्याचा सपाटा लावुन मोक्याच्या जागेसह अर्धे अधिक रस्ते गिळंकृत केले आहेत.शहराच्या बसस्टॉप, थोरात चौक,फव्वारा चौक,आयडीबीआय बँक ते किट्टु मॉल या मार्गावर अक्षरशः अतिक्रमण धारकांनी मनमर्जी अनाधिकृत बांधकाम केले असल्याने व खरेदीदार आपली वाहने चक्क दुकानासमोरच उभी ठेवत असल्याने बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
देसाईगंज शहर गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असुन येथील कपडा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.लग्न अथवा इतर संभारंभांच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम,अतिसंवेदनशील सिरोंचा,भामरागड, कोरची, नॉडेकल पासुन ते चंद्रपुर,भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचा कपडे खरेदीसाठी देसाईगंजला येण्याचा मोठा ओघ आहे.
मात्र पार्किंगची निर्माण करण्यात आलेली कृत्रीम समस्या,मुख्य मार्गावर बेकायदेशीर अतिक्रमण करुन अनाधिकृत करण्यात आलेले बांधकाम,चक्क मुख्य मार्गावरच दुकानदार थाटत असलेले बिर्हाड,यामुळे शहराच्या बसस्टॉप पासुन ते मुख्य बाजारपेठेत वाहतुकीची समस्या गंभीर असल्याचे वास्तविक सत्य आहे. तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा यांनी काही वर्षापुर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन युद्धस्तरावर अतिक्रमण काढताना थातुरमातुर कारवाई केल्याने शहराच्या मुख्य मार्गावरील समस्या अद्यापही कायम आहे.याबाबत मुख्याधिकारी सतिश चौधरी हे सक्त भुमिका बजावणारे अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त असल्याने गंभीर होत चाललेली अतिक्रमणाची समस्या मार्गी लावतील अशी रास्त अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार संकुलनाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
देसाईगंज शहर नगर विकास आराखड्यात आठवडी बाजारासाठी आरक्षण क्रमांक-३२ या आरक्षित जागेवर एकात्मिक शहर विकास योजने अंतर्गत एकुण ७५ गाळे बांधकामासाठी ६३ लाख १४ हजार ३२० रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता.मात्र याठिकाणी सभोवताल मोठ्या प्रमाणात अनाधिकृत अतिक्रमण करुन पक्के बांधकाम करण्यात आल्याने बाजार संकुलनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे.यामुळे एकुणच नगर प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभारा प्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन बाजार संकुलनाचा प्रश्न यथाशिघ्र मार्गी लावण्याची मागणी करण्यात येत आहे.