अवघ्या 117 चेंडूत द्विशतक; भारताने 406 धावांचे गाठले लक्ष्य
गुवाहाटी (Shubman Gill Record) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने विक्रमी द्विशतक झळकावत इतिहास रचला. गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजने दिलेल्या 406 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गिलने अवघ्या 117 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक झळकावणारा फलंदाज म्हणून त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला.
गिलने (Shubman Gill Record) या कामगिरीसह भारताच्याच ईशान किशनचा विक्रम मोडला. ईशानने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 126 चेंडूत द्विशतक झळकावले होते. गिलने हा विक्रम तब्बल नऊ चेंडूंनी मागे टाकला. गिलने केवळ 62 चेंडूत शतक पूर्ण केले आणि त्यानंतर फलंदाजीचा वेग आणखी वाढवत अवघ्या 55 चेंडूत 100 ते 200 धावांचा टप्पा गाठला. गिलने 133 चेंडूत नाबाद 223 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत 26 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. कर्णधार म्हणून वनडेमध्ये 200 हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
वनडेत दोन द्विशतके करणारा दुसरा भारतीय
या द्विशतकासह गिलने (Shubman Gill Record) वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली. वनडेमध्ये दोन किंवा त्याहून अधिक द्विशतके झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी केवळ रोहित शर्मा याने ही कामगिरी केली आहे. गिलने यापूर्वी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे 208 धावांची खेळी करत पहिले वनडे द्विशतक झळकावले होते. आता गुवाहाटीमध्ये दुसरे द्विशतक करत त्याने (Rohit Sharma) रोहित शर्मासोबत विशेष विक्रमाच्या क्लबमध्ये प्रवेश केला.
रोहित-गिलची 255 धावांची भागीदारी
406 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना (Rohit Sharma) रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubman Gill Record) यांनी भारतीय डावाची दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 255 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 101धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत लक्ष्य सहज गाठले. (Virat Kohli) विराट कोहलीने 29 धावा केल्या, तर (Ruturaj Gaikwad) ऋतुराज गायकवाडने नाबाद 31 धावा केल्या.
भारताचा वनडेमधील सर्वाधिक यशस्वी रनचेस
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 405 धावांचा डोंगर उभारला. जॉन कॅम्पबेल, शाई होप आणि आमिर जांगू यांनी शतके झळकावत वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारून दिली. भारताने हे 406 धावांचे लक्ष्य ४४व्या षटकात अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. वनडे क्रिकेटमध्ये भारताने यापूर्वी यशस्वीपणे गाठलेले सर्वाधिक लक्ष्य 360 धावांचे होते. त्यामुळे 406 धावांचा पाठलाग करत भारताने स्वतःचाच विक्रम मागे टाकला. या सामन्यात एकूण पाच शतके झळकली. वेस्ट इंडिजकडून तीन, तर भारताकडून दोन फलंदाजांनी शतके ठोकली. भारताने या विजयासह मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.